मंचर : शालेय शिक्षण विभागाच्या ४ नोव्हेंबरच्या परिपत्रकामध्ये दरप्र सोमवारी शिक्षकांनी १० विद्यार्थ्यांचा गट करून सेल्फी काढून ‘सरल प्रणाली’त तो अपडेट करायचा आहे. या प्रक्रियेला सोमवारी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाने विरोध केला आहे, अशी माहिती अध्यक्ष विजय घिसे व सरचिटणीस सुनील भेके यांनी सांगितले. सेल्फीवर बहिष्काराचे निवेदन गटविकास अधिकारी राहुल काळभोर, विस्तार अधिकारी रामदास पाल्ोकर यांना तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले.राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ४ नोव्हेंबरला काढलेल्या परिपत्रकात विद्यार्थ्यांची गळती व गैरहजेरी कमी करण्याचे कारण दाखवून दर सोमवारी वर्गशिक्षकाने १० विद्यार्थ्यांचा गट तयार करून त्यांचा स्वत:सोबत सेल्फी घ्यावा व तो ‘सरल प्रणाली’त आॅनलाईन अपडेट करावा, असे आदेश दिले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या निर्णयाविरोधात भूमिका घेऊन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन गळती गैरहजेरी व सेल्फीचा संबंध येत नाही. या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार असून, त्याबाबत अनेक बाबी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सेल्फीबरोबरच वर्गशिक्षकांनी दैनंदिन हजेरी आॅनलाईन सरल प्रणालीत भरण्याची सक्ती शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. ही माहिती आंबेगाव तालुक्यातील शाळेतूनच भरावी लागणार आहे; परंतु आंबेगाव तालुक्यातील बहुतांश शाळा दुर्गम आदिवासी डोंगराळ भागात असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांना ही माहिती सरल प्रणालीत अपडेट करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (वार्ताहर)मोठ्या पटसंख्येच्या शाळांना फटकायापूर्वी शालेय पोषण आहार योजनेसाठी एमडीएम अॅपद्वारे विद्यार्थी दैनंदिन हजेरी आॅनलाईन भरण्याचे काम शिक्षक करीत असताना पुन्हा उपस्थिती अॅपमध्ये दैनंदिन हजेरी भरण्याची सक्ती शासनाकडून केली जात आहे. हा प्रश्न अनुत्तरितच आहे. विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून सरल प्रणालीवर अपलोड करण्याचा आदेश म्हणजे शिक्षकांवरील अविश्वास आहे. हा प्रकार फारच त्रासदायक व मानहानिकारक असून, १० ते २० पटसंख्येच्या शाळा नजरेसमोर ठेवून हा आदेश काढला असला, तरी मोठ्या पटसंख्येच्या शाळा यात भरडून निघणार आहेत.शिक्षकांवर याअगोदरच शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्त्या, सरल प्रणाली या कामांचा ताण असून इंटरनेट सुविधा, मोबाईल रेंज, विजेची उलब्धता इ. समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सेल्फीवर बहिष्काराचे निवेदन गटविकास अधिकारी राहुल काळभोर, विस्तार अधिकारी रामदास पाल्ोकर यांना तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले.
सेल्फीवर शिक्षकांचा बहिष्कार
By admin | Published: January 10, 2017 2:32 AM