लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील दोन वर्षांपासून प्रत्येकालाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकासाठी कसे काम केले जाईल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आपला वेळ, पैसा, श्रम दिले तरीही नि:स्वार्थीपणे काम होणे गरजेचे आहे. नि:स्वार्थी कार्यातून समाज सशक्त होईल असे मत राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी व्यक्त केले.
माणुसकीचे दूत व्यासपीठातर्फे विश्रामबाग वाड्यासमोरील झांजले विठ्ठल मंदिरात धान्य किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोळंकी म्हणाले की, आज राज्यात ५ ते १० लाख मुले शालाबाह्य होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येकजण मर्यादित स्वरुपात छोटे काम करीत आहे. पण ते काम आपण किती आत्मीयतेने, प्रेमाने करतो हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मनसे सरचिटणीस ॲॅड. किशोर शिंदे, शिक्षण प्रसारक मंडळाचे पराग ठाकूर, माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, नरेंद्र तांबोळी, प्रशांत कनोजीया, राजेंद्र काकडे, श्रेयस देशमुख, संयोजक सारंग सराफ, करण सुरवसे, अभिजित जागडे, आदित्य राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक सुनील शिवले यांचा सन्मान करण्यात आला. घरगुती कामगार, छायाचित्रकार, कलाकार यांना धान्यरुपी मदत देण्यात आली. व्यासपीठातर्फे एकूण ११०० कुटुंबांना धान्याच्या किटची मदत देण्यात आली.
फोटो ओळ : माणुसकीचे दूत व्यासपीठातर्फे विश्रामबाग वाड्यासमोरील झांजले विठ्ठल मंदिरात स्कूलबस चालकांना धान्य किट देण्याचा उपक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी व उपस्थित मान्यवर.
फोटो - विशाल सोलंकी