पिंपरी : पावसाने दडी मारल्याने या वर्षी फुलशेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला. दसऱ्यासाठी मागणी असलेल्या झेंडूची आवक घटल्यामुळे भाव एका दिवसांत चौपट झाले. शेतक-यांकडून १०० रुपये किलोने बुधवारी खरेदी करण्यात आलेल्या झेंडू दलाल व विक्रेत्यांनी दसऱ्या दिवशी ४०० रुपये किलोने विकला. फुल उत्पादक शेतकरी खूश होता. परंतु, झेंडूच्या उच्चांकी भावाचे खरे सोने विके्रत्यांनी लुटले. पिंपरी कॅम्प येथील फुलबाजारात दर वर्षी दसरा व खंडेनवमीच्या दिवशी झेंडूच्या निरनिराळ्या जातींच्या फुलांची आवक होते. यंदा बाजारात अगोदर दोन दिवसांपासून झेंडूची आवक किरकोळ प्रमाणात सुरू झाली. त्यामध्ये पिवळा व नारंगी कलकत्ता, साधा नारंगी व पिवळा झेंडू यांचा समावेश होता. याशिवाय अष्टर, शेवंती, गुलछडी, गुलाब, जरबेरा या फुलांनाही मागणी होती. मोशी, चऱ्होली, चिखली, साळुंब्रे, गोडुंब्रे, तसेच नगर येथून झेंडूची आवक झाली. गतवर्षांपेक्षा आवक कमी असल्याचा अंदाज विक्रत्यांना आला. त्यामुळे दस-याच्या पार्श्वभूमीवर विक्रत्यांनी उत्पादक शेतक-यांकडून १०० ते १५० रुपये भावाने झेंडूची खरेदी केली. परंतु, दसऱ्याच्या दिवशी गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत ८० टक्के माल संपला. त्यामुळे झेंडूचा भाव दुपटीने वाढवून ३०० रुपये करण्यात आला. त्यानंतरही मागणी सुरू राहिल्यानंतर दुपारी २ पर्यंत झेंडूचा भाव ४०० रुपये किलोपर्यंत वाढविण्यात आला. बाजारात झेंडू मिळत नसल्याने ग्राहकांना वाढीव भावाने खरेदीशिवाय पर्याय नव्हता. यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होवून त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे पावसाचा फटका फुल शेतीला झाला. (प्रतिनिधी)पिंपरी बाजारातील दसऱ्या दिवशीचे भावझेंडू- ३०० ते ४०० रुपये किलो, शेवंती- २०० रुपये किलो, अष्टर- २०० रुपये किलो, डच गुलाबाची २० फुलांची गड्डी १०० रुपये, साधा २० गुलाबाची फुलांची गड्डी ५० रुपये, जरबेरा व गुलाबाचे एक फूल १० रुपये अशी विक्री सुरू होती.गतवर्षी दसऱ्याला शिल्लक झेंडू फेकून द्यावा लागला होता. त्यामुळे शेतकरी व विके्रत्यांना तोटा सहन करावा लागला. यंदा भाव मिळाल्याने शेतकरी, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना चांगला नफा मिळाला आहे.- सत्यवान खेडकर, फुल विक्रेता, पिंपरी.
विक्रेत्यांनी लुटले सोने
By admin | Published: October 23, 2015 3:28 AM