पुणे - सैन्यदल व राज्य कामगार विमा योजनेसाठी वापरण्यात येणारी दोन प्रकारची औषधे खुल्या बाजारात विकली जात असल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यासह मुंबई व नाशिकमध्ये याची व्याप्ती पसरली आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील चार औषध वितरकांकडून ३ लाख २५ लाख रुपयांची औषधे जप्त केली आहेत.कोणत्याही विशेष योजनेसाठी असलेल्या औषधांवर संबंधित कंपनीकडून तसा स्पष्टपणे उल्लेख केला जातो. त्यामुळे या औषधांची खुल्या बाजारात विक्री करता येत नाही. पण काही औषध वितरकांनी या औषधांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. दोन औषध कंपन्यांकडून मुंबईमध्ये सैन्यदल व राज्य कामगार विमा योजनेसाठी जनुविया व गॅलवस या दोन गोळ््यांचा पुरवठा केला जातो. या गोळ््यांच्या पाकिटावर तसे नमूदही केले जाते. पण खासगी वितरणात ही औषध आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर मुंबईत काही औषध वितरकांवर छापे टाकण्यात आले.त्यामध्ये लाखो रुपयांच्या औषधांची खुल्या बाजारात विक्री झाल्याचे समोर आले. सैन्यदल व राज्य कामगार विमा योजनेतील काही जण किंवा औषध कंपन्यांच्या एजंटकडून ही औषधेबाजारात आणली असल्याची शक्यता आहे.औषधांची खुल्या बाजारात विक्री करताना पाकिटांवर नमूद केलेले ‘फक्त शासकीय वितरणासाठी’ हे खोडले आहे. त्यामुळे संबंधित वितरकांना या औषधांची विक्री करताना अडचण आली नाही. त्यांच्याकडून शहरातील अनेक औषध विक्रेत्यांनी ही औषधे खरेदी केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविला जाईल.- एस. बी. पाटील, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे
सैन्य दलाच्या औषधांची खुल्या बाजारात विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 5:21 AM