-किरण शिंदे
पुणे: पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून 714 ग्रॅम मेफेड्रोन (M.D.) जप्त करण्यात आलयं. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत तब्बल 1 कोटी 7 लाख इतकी आहे. अरविंद रवींद्र बिऱ्हाड़े (वय 35, रा. संभाजीनगर, अंमळनेर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमाननगर परिसरातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाजवळ एक व्यक्ती ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली होती. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन खातरजमा केली आणि आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी सिम्बॉयसिस महाविद्यालय परिसरात सापळा रचला. त्यानंतर महाविद्यालय परिसरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या अरविंद बिराडे याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना तब्बल एक कोटी सात लाख रुपयांचा ड्रग सापडलं.
अरविंद बिराडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी अमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत. यातील एका गुन्ह्यात तो फरारी आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने हे ड्रग्स कुठून आणले आणि कुणाला विकणार होता याबाबत तपास सुरू आहे.