पुणे : सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच उद्देशाने पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात साेमवारी (दि. ११) पादचारी दिनी लक्ष्मी रस्ता "वॉकिंग प्लाझा" करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सांयकाळी ८ या वेळेत हा रस्ता वाहनांना वापरता येणार नाही. लक्ष्मी रस्त्यावर येण्यासाठी महामेट्रो मार्फत डेक्कन मेट्रो स्थानक आणि पुणे महापालिका मेट्रो स्थानकापासून खास सायकलींचे आयोजन केले आहे. ‘पीएमपी’मार्फत जादा बस सेवा पुरविण्यात येणार आहेत.
पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकेत गेल्या दोन वर्षापासून पादचारी दिन साजरा करत आहे. याअंतर्गत लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक हा भाग सकाळी १० ते सांयकाळी ८ या वेळेत सर्व वाहतुकीस आणि पार्किंगसाठी बंद ठेवून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिका सलग तिसऱ्यांदा हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहे.
पुण्यातील १०० चौकात पादचारी उपाय
शहराच्या विविध भागात पदपथांची देखभाल दुरुस्ती करून पादचाऱ्यांना पदपथावरून विनाअडथळा चालता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. पुण्यातील १०० महत्वाच्या चौकात पादचारी सुरक्षेबाबत उपाय केले जात आहेत. या दिवशी लोकप्रबोधनासाठी आणि नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, असे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली.
लक्ष्मी रस्त्याला नवे रूप येणार
लक्ष्मी रस्त्याला १०० वर्ष पूर्ण झालेल्या एक नवे रूप येणार आहे. येणाऱ्या काळात मेट्रो व सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी, खासगी वाहनांचे प्रमाण कमी करण्यासाठी चालणे हा पर्याय अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. त्या दृष्टीने पादचारी दिन हा याच बरोबर सामान्य नागरिकांना देखील आपली काही कला सादर करायची असल्यास लक्ष्मी रस्ता "वॉकिंग प्लाझा" स्टेजसाठी खुले आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सादरीकरण करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
असा असेल पर्यायी मार्ग
- लक्ष्मी रस्ता पादचारी दिनाच्या दिवशी बंद राहणार आहे. त्यामुळे लक्ष्मी रोडने बेलबाग चौकातून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रोडने इच्छित स्थळी जातील.- कुमठेकर रोडवरून लक्ष्मी रोडवर जाणारी सर्व वाहने सरळ चितळे कॉर्नरने डावीकडे वळून बाजीराव रोडने इच्छित स्थळी जातील.- रमणबाग चौकाकडून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रोडकडे न जाता सरळ केळकर रोडने टिळक चौक मार्ग इच्छित स्थळी जातील.- निंबाळकर तालीम चौकाकडून कुंठे चौकाकडे जाणारी सर्व वाहने लक्ष्मी रोडकडे न जाता सरळ केळकर रोडने टिळक चौक मार्ग इच्छित स्थळी जातील, असे पाेलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.
राबविले जाणार हे उपक्रम...
- सेव किड्स फाउंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षा बाबत कार्यशाळा- एकांश ट्रस्ट तर्फे अंध अपंग नागरिक यांच्याबाबत संवेदनशीलता व सार्वत्रिक प्रवेश विषयक कार्यशाळा- सेव पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट तर्फे पादचारी अधिकारांबाबत कार्यशाळा- परिसर संस्थेमार्फत सार्वजनिक वाहतूक व जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन- आईटीडीपी संस्थेमार्फत रस्त्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन- साथी हाथ बढाना संस्थेमार्फत मानसिक आरोग्याबाबत पथनाट्य- रंग कला अकादमी तर्फे पादचारी दिनाबाबत भव्य रांगोळी- इतिहास प्रेमी नागरिकांसाठी शौर्य खेळ- रास्मा संस्थेमार्फत संगीत व वाद्य कला सादरीकरण- पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थेमार्फत प्रदर्शन