पुणे: सोशल मीडियावर ओळख वाढवून आईच्या उपचारासाठी पैश्यांची गरज असल्याचे सांगून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. ४) विश्रांतवाडी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे हा प्रकार सप्टेंबर २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२३ यादरम्यान घडला आहे. तक्रारदार महिलेची अनोळखी आरोपीसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर आरोपीने महिलेचा नंबर मागितला. त्यानंतर दोघांमध्ये रोज संभाषण होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही कालांतराने तक्रारदार महिलेला आईला उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. मी दुबईमध्ये असल्याने आईचा भारतात उपचार करण्यासाठी तुझी मदत हवी आहे. त्यासाठी मी इथून काही रोख रक्कम पाठवत असून तू ती एक्स्चेंज करून घे असे आरोपीने फिर्यादी महिलेला सांगितले. त्यांनतर आरोपीची साथीदार सुमीत्र हिने महिलेला संपर्क केला. तुमच्या नावाने आलेले पार्सल हे बेकायदेशीर असून त्यासाठी तुम्हाला क्लिअरन्स फी, कस्टम चार्जेस लागतील असे सांगितले. वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून एकूण ७ लाख ५१ हजार रुपये उकळले. महिलेला संशय आल्याने यासंदर्भात विचारपूस केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनतर तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब नोंदवला. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक खंदारे पुढील तपास करत आहेत.