पुणे : ‘गिरीवन प्रोजेक्ट’ ही कंपनी सरकारमान्य असल्याचा दावा करून खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित करून मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीरपणे विक्री करून, १४ खातेदारांची सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अॅड. जयंत रामभाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरुद्ध पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट (वय ५७, रा. वूडलँड अपार्टमेंट, कोथरूड) यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली असून, त्यांच्याबरोबर इतर १४ जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश अलिकडेच दिला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी यांनी २५ वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करून त्यांनी ‘गिरीवन प्रोजेक्ट’ या कंपनीची स्थापना केली. त्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अध्यक्ष आहेत. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करून त्यांनी खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित केले. २०१६ मध्ये जयंत म्हाळगी व सुुजाता म्हाळगी यांनी फिर्यादींनी खरेदी केलेला प्लॉट सरकारी मोजणी करून देत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. त्यांच्याकडून विना हरकत मोजण्या करून घ्याव्यात, असा आदेश असताना संचालक वेळोवेळी हरकत घेत आहेत. त्या वेळी प्लॉटधारकांनी मोजणी करून घेतल्यावर त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. तसेच ‘गिरीवन प्रोजेक्ट हा प्रायव्हेट हिल स्टेशन आहे,’ असे सांगून फसविले आहे असे फिर्यादीचे म्हणणे आहे. तक्रारदार असलेल्या १४ जणांना जाणूनबुजून चुकीच्या गटात खरेदीखत देणे, खरेदीखतात दिलेल्या गटापेक्षा जवळ जवळ दीड किमी लांब पझेशन देणे, खरेदी खतात दिलेला गट व पझेशन दिलेला गटसारखा नसणे, काहींना आजपर्यंत पझेशन घेऊ दिले नाही. पैसे घेऊन खरेदीखताप्रमाणे क्षेत्र न देणे, खरेदी केलेल्या प्लॉटवर जाऊ न देणे, अशी विविध प्रकारे या प्लॉटधारकांची फसवणूक केली आहे. या प्लॉटधारकांची एकूण ९६ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूकझाली असल्याचा दावा केला आहे . या सर्वांवर ४२०, ४६५, ४६८, ३४१, ४४७, ४२७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...........
* याप्रकरणी ' गिरीवन ' कडून खुलासा....
गिरीवन संस्था गेली ३० वर्ष व्यवस्थित सुरु आहे. तेथील काही जमीन मालकांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करून घेतली असता त्यांना त्यांचा सात बारा उतारा व वहिवाट यात फरक असल्याचे आढळून आले. जमिनीची मालकी आणि वहिवाट या दिवाणी स्वरूपाच्या विषयांमधील फरकांची विसंगती कशी दूर करता येईल याबाबत संबंधित जमीन मालकांच्या बरोबर बोलणी सुरु आहे. कोणाचीही फसवणूक करण्याचा गिरीवनचा हेतू कधीही नव्हता आणि नाही. परंतु काही मालकांनी याबाबत फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. त्याचा अद्याप तपास चालू आहे. गिरीवनची कायदेशीर बाजू आम्ही त्यात मांडत आहोत. - गिरीवन प्रकल्प