श्रीकिशन काळे -पुणे : उन्हाचा कडाका जाणवू लागला असल्याने पाण्यासाठी माणसांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील वन्यजीवांसाठी वन विभागातर्फे पाणवठे, टॅँकरची सोय करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यात सुमारे तीनशे पाणवठे वन विभागातर्फे तयार केलेले आहेत; तसेच ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही, तिथे टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काही स्वयंसेवी संस्था, तरुण मुले-मुली, ग्रामपंचायतदेखील त्यासाठी मदत करीत आहेत. उन्हामुळे झाडे वाळून जाऊ नयेत म्हणून अनेक वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था आपापल्या भागात झाडांना पाणी देण्याचे काम करत आहेत. अनेक टेकड्यांवर अशी कामे होत आहेत. वन विभाग प्रत्येक ठिकाणी काम करू शकत नाही. त्यांच्याकडे मनुष्यबळही खूप नसते. म्हणून नागरिकांनीदेखील त्यांना सहकार्य करून झाडांची तहान भागविली पाहिजे. दिघी येथील दत्त गडावर गेल्या अनेक वर्षांपासून ‘अविरत श्रमदान’ या संस्थेतर्फे झाडांची निगा राखली जात आहे. २०१७ पासून या ठिकाणी झाडं लावून त्यांना नियमित पाणी देण्याचे कामही संस्था करीत अहे. सुमारे साडेतीन हजार झाडे येथे हिरवाईने फुलली आहेत. यासाठी संस्थेचे सचिन लांडगे, सुनील पाटील, डॉ. नीलेश लोंढे, जितेंद्र माळी, विश्वजित डोंगरे, अॅड. सुनील कदम, संदीप पाटील, धनाजी पाटील आदी काम करीत आहेत. रोज सकाळी साडेसहा ते साडे आठ या वेळेत पाणी दिले जाते. पक्ष्यांसाठी खाण्याची सोयदेखील केली आहे, अशी माहिती धनाजी पाटील यांनी दिली. .........
शेतकरीदेखील देताहेत पाणी जिल्ह्यातील पळसदेव (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रात सुमारे २७ हजार झाडे यंदा लावली आहेत. ती जगविण्याचे काम वनपाल आर. डी. इंगवळे करीत आहेत. तसेच, एका ठिकाणी १६०० झाडे आहेत. तिथे देखील शेतकरी नाना भांडे हे आपली पाण्याची मोटार देऊन मदत करीत आहेत. तर, विशाल येडे हे शेतकरी पळसदेव येथील झाडांसाठी मदत करत आहेत. ..........यंदा लावलेली झाडे छोटी असल्याने त्यांना जगविणे गरजेचे आहे, असे इंगवळे यांनी सांगितले. दरम्यान, कडबनवाडी येथील चिंकारा अभयारण्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहे. .........जिल्ह्यात टॅँकरने झाडांना पाणी पुणे जिल्ह्यातील लावलेल्या झाडांना पाण्याची सोय केलेली आहे. वन्यजीवांसाठी देखील पाणवठे तयार आहेत. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींची मदत होत आहे. गतवर्षी आम्ही सरकारकडे टॅँकरसाठी प्रस्ताव दिला होता. त्यातून १२ टॅँकर मिळाले आहेत. त्यातील दोन आता इंदापूरला सुरू आहेत. इतर लवकरच सुरू करणार आहोत. सध्या जमिनीत अजून ओलावा आहे. एप्रिल मे महिन्यात झाडांना पाणी देण्याची सोय करणार आहोत. - श्रीलक्ष्मी ए., उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग