पुणे: सध्या सर्वच क्षेत्रात डिजिटल व्यवहार वाढले आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाकडून पुणे एसटी विभागात वीस दिवसांपूर्वी नुकतेच यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सेवा उपलब्ध करुन दिली. मात्र, या ऑनलाइन सुविधेचा वापर कशाप्रकारे करायचा याचे प्रशिक्षण मात्र वाहकांना देण्यात आले नाही. त्यात काही वेळा पेमेंट पेडिंग पडत असल्यामुळे निवृत्तीजवळ आलेले वाहक संभ्रमात पडत आहेत. परिणामी ऑनलाइन पेमेंट सुरुळीत होण्यासाठी सर्वच वाहकांना प्रशिक्षणाची आवश्यकता भासत आहे.
सुट्या पैशांची कटकट संपावी, प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवण्यात याव्यात, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सोय प्रवाशांना करून दिली. मात्र, याचे प्रशिक्षणच वाहकांना न मिळाल्याने अनेक प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येत नाहीये. त्यामुळे या प्रणालीद्वारे तिकीट काढण्याची सेवा उपलब्ध नाही, असेच उत्तर काही वाहकांकडून ऐकायला मिळत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. दैनंदिन जीवनात रोखीने व्यवहाराऐवजी यूपीआयद्वारे पैसे स्वीकारले जात आहेत. सुरुवातीला व्यवहार करण्याबाबत दडपण होते. मात्र, आता सर्वजण या ऑनलाइन प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. तेव्हा बदलत्या काळानुसार राज्य परिवहन मंडळाने इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमधून तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा वापरही सुरु आहे. मात्र, अनेक वाहकांना यामधून तिकीट कसे काढावे, याची माहितीच नाही. तेव्हा प्रवाशांना नकारघंटा ऐकावी लागत आहे.परंतु अडचणीमुळे काही वाहक कॅश पैसे मागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होत आहे.
कोल्हापूरवरुन पुण्याला येत होतो. क्यूआर कोड स्कॅन करुन तिकीट देण्याची विनंती वाहकाला केली. मात्र सरोवर डाऊन आहे रेंज नाही असे काहीतरी कारण सांगत ऑनलाइन तिकीट देण्यास टाळाटाळ केली. तसेच तिकीट काढताना अडचणी येतात, असे सांगितेले. - विनोद सदामते प्रवासी