पुणे : औंध येथील सिंध सोसायटीमधील एका बंगल्यात शिरुन ज्येष्ठ दाम्पत्य व त्यांच्या कुकला चाकूचा धाक दाखवून बाथरुममध्ये कोंडले व घरातील १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.चोरट्यांनी बाथरुमचा दरवाजा १० मिनिटे उघडायचा नाही. उघडला तर पुन्हा येऊन मारु असा दम दिला होता. त्यामुळे चोरटे गेल्यानंतर बर्याच वेळाने हे दाम्पत्य बाहेर आले व त्यांनी मुलाला फोन करुन ही घटना सांगितली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
याप्रकरणी एका ७३ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. औंध येथील सिंध सोसायटीतील बंगला क्रमांक ८१७ मध्ये फिर्यादी या पतीसह राहतात. त्यांच्याकडे एक केअर टेकर व कुक म्हणून काम करतो. तो त्यांच्याकडेच राहतो. रविवारी रात्री तिघे जण बंगला शिरुन किचनच्या बाजूने येत असल्याचे कुकने पाहिले. त्याने हटकल्यावर तिघे घरात शिरले. त्यांनी कुकच्या पोटाला चाकू लावून त्याची झडती घेत पैशांची मागणी केली. त्यानंतर ते कुकला घेऊन पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये आले. तेव्हा या महिलेने त्यांच्याबद्दल विचारल्यावर त्यांच्यातील एक जण त्यांच्याजवळ आला. त्याने पैसा पैसा असे म्हणत या महिलेच्या गळ्याला चाकू लावला. त्यांच्याकडील पर्स हिसकावून घेतली. त्यानंतर दुसर्या चोरट्याने त्यांच्या पतीच्या गळ्याला चाकू लावून पैसा किधर रखे है, असे विचारुन मारहाण करु लागले. त्यावेळी फिर्यादी महिलेने मारहाण करु नका असे म्हणून त्यांना बेडरुमचे कपाट उघडून दिले. त्यांनी कपाटातील ऐवज काढून घेतला. तसेच त्यांच्या हातातील अंगठ्या ही जबरदस्तीने काढून घेतल्या. त्यानंतर चोरट्यांनी तिघांना बाथरुममध्ये बंद केले.
चोरट्यांनी त्यांच्याकडील हिरे, सोने, खडे असलेल्या १२ अंगठ्या, कानातील रिंग, हिर्याची रिंग, मोत्याचा चोकर, दोन हार, सोनसाखळी, मंगळसुत्र, दोन ब्रेसलेट, ५ लेडिज घड्याळे, ५ चांदीचे कॉईन, ७० हजार रुपये रोख व १ हजार युएस डॉलर असा १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी करण्यात सुरुवात केली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.़़़़़चोरट्यांनी पळून जाण्यापूर्वी सर्वांना बाथरुममध्ये कोंडले होते. त्यांच्या हातात घरातील भिंतीवरील घड्याळ दिले़ दहा मिनिटे होईपर्यंत बाहेर यायचे नाही. नाही तर पुन्हा येऊन मारुन टाकेन, अशी धमकी दिली. त्या दाम्पत्याचा मोबाईलवर फोटो काढून घेतला.त्यामुळे घाबरलेले हे दाम्पत्य व कुक जवळपास २० मिनिटे आतच होते. चोरटे गेल्याचे लक्षात आल्यावर दरवाजा तोडून ते बाहेर आले व त्यांनी मुलाशी संपर्क साधला.