अमोल जायभाये, पिंपरीज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस विभागाच्या वतीने विशेष हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे. ती अतिशय उपयुक्त आहे. मात्र, त्याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या हेल्पलाइनबाबत माहिती नसल्याने तिला ज्येष्ठांकडून मिळणारा प्रतिसाद अतिशय अल्प आहे. घरामध्ये आजी-आजोबा आहेत, त्यांच्याकडे बघायला कोणालाच वेळ नाही. घरातील अनेक जण नोकरी करीत असल्यामुळे ज्येष्ठ वेगळे पडले आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी कोणीच तयार नसते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. आपले प्रश्न कोणाकडे मांडायचे, त्यावर उत्तरे कशी शोधायची असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभे राहू लागले. ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कौटुंबिक हिंसाचार तर हा नेहमीचाच प्रकार आहे. या हिंसाचारामध्ये ज्येष्ठांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. जे ज्येष्ठ नागरिक एकटे किंवा वेगळे राहत आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. घरामध्ये तरुण व्यक्ती नसल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्या-आणण्यासाठी कोणीच नसते. रिक्षा किंवा इतर वाहनाचा उपयोग केल्यास त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळले जातात. जीवनावश्यक वस्तू आणून देण्यासाठीही कोणी नसते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्वयपांक करण्यात अडचणी येतात. त्यामुळे ते बाहेरून डबा बोलवतात. त्यामुळे त्यांना तीन-चार महिन्यातून एकदाच गॅस भरून लागतो. तो गॅस एजन्सीवाले देत नाहीत. औषधे आणून देण्यासाठीसुद्धा कोणी नसते. अशा वेळी त्यांना मदत करण्यासाठी पोलीस प्रशासन सरसावले. मात्र, त्याची पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धी झाली नाही.
हेल्पलाइनची मदत घेईनात ज्येष्ठ नागरिक
By admin | Published: November 05, 2014 5:34 AM