ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी उत्तमराव भूमकर यांचे निधन; पुण्यातील काँग्रेस भवनमध्येच घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 06:34 PM2021-08-01T18:34:19+5:302021-08-01T18:40:05+5:30
काँग्रेस भवनमध्ये वृक्षारोपण करतानाच त्यांना अचानक चक्कर आली व ते खाली पडले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
पुणे: शहर काँग्रेसचे कार्यालयीन सचिव, ज्येष्ठ नागरिक काँग्रेसचे संस्थापक उत्तमराव भूमकर यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. काँग्रेस भवनमध्ये वृक्षारोपण करतानाच त्यांना अचानक चक्कर आली व ते खाली पडले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये व्यर्थ न हो बलिदान या मोहिमेतंर्गत स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व अन्य कार्यक्रम होणार होते. त्याची तयारी करत असतानाच भूमकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड, शहर सरचिटणीस रमेश अय्यर व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भूमकर यांना श्रद्धांजली अर्पण करून सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले.
अल्पपरिचय
काँग्रेसच्या नव्याजून्या पिढीतील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये भूमकर परिचित होते. मागील जवळपास सलग ३० वर्षे ते काँग्रेस भवनमध्ये कार्यालयीन सचिव म्हणून काम पहात होते. वय झाले असले तरी कुटुंबिय, काँग्रेस पदाधिकारी यांचा रोष पत्करून ते पक्ष कार्यात सक्रिय होते. काँग्रेस भवनमधील रोजची फेरी त्यांनी कधीही चुकवली नाही. स्वच्छ पांढरा हाफ शर्ट, पँट, गांधी टोपी आणि सतत काही ना काही सांगण्याच्या अविर्भात अशी भूमकर यांची छबी काँग्रेस भवनमध्ये कायम ऊपस्थित असे.
सत्तेचा लोभ त्यांना कधीही नव्हता. शिक्षण मंडळाचे एकदा ते सदस्य झाले. त्याशिवाय त्यांना सत्तेचे कोणतेही पद कधी मिळाले नाही. त्याची खंत कधीही त्यांच्या बोलण्यावागण्यात दिसत नसे. काँग्रेसबद्दल त्यांना फार प्रेम होते. भूमकर यांचा सोमवारी ८३ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त प्रुथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा रविवारी सन्मान करण्यात येणार होता. तत्पूर्वीच त्यांनी जगाचा निरोप
घेतला.