पुणे : ज्येष्ठ संपादक व लेखक सदा डुंबरे यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेले दहा- बारा दिवस कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (दि.२५) संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डुंबरे यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
सदा डुंबरे यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात पार पडले. फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिक विज्ञानातील पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी संपादन केली. इंग्लंडच्या ‘थॉम्सन फाउंडेशन’चा प्रगत पत्रकारितेचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन विभागात अतिथी प्राध्यापक, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, ‘इंडसर्च’ या व्यवस्थापनशास्त्र संस्थेच्या अभ्यासमंडळाचे सदस्य अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. डुंबरे हे ‘भारतीय जैन संघटना’ या संस्थेचे पाच वर्षे संचालक होते.
डुंबरे यांनी दीर्घकाळ ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. त्यांनी लिहिलेली ‘आरसपानी’, ‘प्रतिबिंब’, ‘दशकवेध’, ‘कर के देखो’ आणि ‘देणारं झाड’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनिल अवचट यांच्यावरील ‘वेध अवलियाचा’ या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे. दिल्लीची प्रेस इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया, पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट अशा संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन केले आहे.