सरोजा परुळकर यांचा जन्म १८ मार्च १९४४ रोजी पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातच प्राथमिक शिक्षण व बी. जे. वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर कोल्हापूरला वास्तव्यास असतानाच त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला. पश्चिम घाट बचाव आंदोलनातील रोजच्या माहितीचे त्यांनी वार्तांकन केले. विलासराव साळुंखे यांच्या ‘पाणीपंचायत’ या उपक्रमाची माहिती संकलित करून त्यावर त्यांनी माहितीपट तयार केला. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावावर प्रथम लेख जो प्रसिद्ध झाला, तो विजय परुळकर यांनी लिहिला होता. त्यासाठीचे छायाचित्रण सरोजा परुळकर यांनी केले होते. तसेच शरद जोशी यांच्या ऊस आंदोलनात सहभागी होऊन महिला आघाडीचे नेतृत्व सरोजा परुळकर यांनी केले होते. या ऊस आंदोलनाच्या केलेल्या वार्तांकनावर आधारित त्यांनी ‘योद्धा शेतकरी’ हे पुस्तक लिहिले. ते राज्यभरात विशेष गाजले. याशिवाय अभ्यास तसेच आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरात भेटलेल्या महिलांवर आधारित त्यांनी ‘बाईमाणूस’ हे पुस्तक लिहिले. ‘माता बालसंगोपन’ या विषयावरील छायाचित्रणासाठी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे विशेष पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. तसेच त्यांच्या पुस्तकाला राज्य शासनाचाही पुरस्कार मिळाला होता.
ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासिका सरोजा परुळकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:16 AM