पुणे - पिंपरी पोलीस आयुक्त्यालयातील गुन्हे शाखेतील युनिट २ चे पोलीस निर्रीक्षक आणि म्हाळुंगे पोलीस चौकीचे प्रभारी अधिकाºयांना १० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे. तक्रारदारा विरुद्धच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयात क फायनल पाठविण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. अनिल ऊर्फ भानुदास अण्णासाहेब जाधव (वय ५६) असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. जाधव यांनी पोलीस कर्मचारी भापकर यांना पैसे घेण्यास पाठविले. त्यांनी झिरो पोलिसाला पैसे घेण्यासाठी पाठविले़ पैसे घेतल्यानंतर टॅप झाल्याचे लक्षात येताच त्याने चालत्या गाडीतून उडी टाकल्याने त्याला पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील हे जखमी झाले आहेत.
चाकण येथील खराबवाडी रोडवर ही घटना घडली. भानुदास जाधव याच्यावर यापूर्वी देखील एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. मुंबईला असताना हे प्रकरण घडले होते़ त्यात ते ६ महिने तुरुंगातही जाऊन आले होते़ त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदाराविरुद्धच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयात क फायनल दाखल करण्यासाठी भानुदास जाधव यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती़ तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला़ पोलीस अधीक्षक राजेश बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची पडताळणी करताना त्यात तडजोड होऊन प्रथम ३ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पैसे देण्यासाठी तक्रारदार यांना खेड तालुक्यातील खराबवाडी येथे बोलविण्यात आले़ तेथे पोलीस कर्मचारी भापकर हा एका गाडीतून तेथे आले़ त्यांनी स्कॉपिओ गाडीतून झिरो पोलिसांला पैसे घेण्यास सांगितले़ त्याने पैसे घेतले आणि जीपमध्ये ते ठेवले़ त्यानंतर त्याने जीप सुरु केली. त्याचवेळी सापळा लावून थांबलेल्या पोलिसांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला़ उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी जीपला पकडले होते.
आपल्यावर टॅप झाला, हे लक्षात येताच त्याने चालू जीपमधून उडी मारली. त्यामुळे जीप तशीच पुढे गेली़ त्यात पाटील हे किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर या झिरो पोलीस पळून गेला होता़ तसेच भापकर ही पळून गेला. जीपमध्ये लाचेची रक्कम तसेच त्या झिरो पोलिसाचा मोबाईल हँडसेट पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांनी भानुदास जाधव यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अधीक्षक राजेश बनसोड हे स्वत: घटनास्थळी गेले़ चाकण पोलीस ठाण्यात जाधव यांच्यावर गुन्हा करुन रात्री उशीरा अटक करण्यात आली. दरम्यान, श्रीहरी पाटील यांना तातडीने पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असून त्यांचा एक्सरे काढण्यात आला़ त्यात फॅक्चर नसल्याने आढळून आले असून किरकोळ जखमी झाले आहेत.