पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे बुधवारी, दि. २९ जानेवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किन्सनने आजारी होते. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी निर्मला सारडा, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते. सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.शंकर सारडा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्यांनी एस.पी. कॉलेजमधून मराठी विषयातील पदवीचे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून एमए केल्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी मास कम्यनिकेशनचे शिक्षणही पूर्ण केले.किशोरवयापासूनच शंकर सारडा यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांची समीक्षा केली आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंब-यांचा त्यांनी अनुवाद केला आहे. सारडा यांचे १९५० पासून बालसाहित्यात मोठे योगदान आहे. झिप-या आणि रत्नी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्टसेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथ वैभव, ग्रंथ विशेष अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमरेंद्र गाडगीळ मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार शंकर सारडा यांना देण्यात आला होता. याशिवाय, पहिल्या ह.मो.मराठे स्मृती गौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.शंकर सारडा यांनी १९६८ साली ह.मो.मराठे यांची ‘नि:ष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही कादंबरी साधनाच्या दिवाळी अंकात अतिथी संपादक या नात्याने प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले. सातारा येथे १९९३ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.--------------शंकर सारडा यांनी भुषवलेली पदे :अध्यक्ष : अ.भा.बालकुमार साहित्य संमेलन, सावंतवाडी (१९९४)कार्याध्यक्ष : महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलन (१९७०)स्वागताध्यक्ष : मराठी प्र्रकाशक परिषद (१९७८)कार्याध्यक्ष : अ.भा.मराठी साहित्य संमेलन, सातारा (१९९३)कार्याध्यक्ष : पहिले अभिजात साहित्य संमेलन, सातारा (१९९४)-----------बालसाहित्य: चतुर चंपा, मधुमुरली, राणीपरीची कृपा, झिप-या आणि रत्नी, गुराख्याचे पोर, चंद्रपरी आणि सोनसखा, राक्षसाने उचलली टेकडी, नंदनवनाची फेरी, मला मोठं व्हायचंय, देवदुताचं दु:ख, सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची, मर्कटराजाच्या लीला, मांत्रिकाची जिरली मस्ती.......समीक्षा व इतर : काही पुस्तके काही लेखक, गुलमोहोर, पुस्तकांचं जग, दूरदेशचे प्रतिभावंत, ग्रंथविशेष, ग्रंथविशेष, ग्रंथचैतन्य, ग्रंथ संवत्सर, स्त्रीवादी कादंब-या, दशकातील पुस्तके, ग्रंथवैभव, विश्वसाहित्यातील फेरफटका, प्रिय चौकसराव, अक्षरभेट, बेस्टसेलर्स, लवंगी मिरच्या (हास्यकथा), जय भोलेनाथ (नाटिका), बोलके कमळ, केनेडी (चरित्र)---------------‘लोकमत’शी विशेष स्नेह :शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते. ‘अक्षरभेट’ या पुस्तकामध्ये त्यांनी ‘लोकमत’शी असलेल्या ॠणानुबंधाचा विशेष उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘लोकमतमुळे महाराष्ट्राच्या सर्व भागातील वाचकवर्गाचा भरघोस प्रतिसाद परीक्षणांना मिळाला. पुस्तकांना मागणीही चांगली आल्याचे प्रकाशकांकडून समजले. लोकमतचे सर्वेसर्वा विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. निर्मल दर्डा यांनी अक्षररंग पुरवणी स्वत:हून काढण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे हे लेखन झाले.’
ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक शंकर सारडा यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 5:40 PM