पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने यंदाच्या वर्षीपासून प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील विद्वानास देण्यात येणारा पहिला ’भांडारकर स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना देण्यात येणार आहे. एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र आणि भांडारकरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोविडमुळे घालण्यात आलेले निर्बंध शिथिल झाल्यावर हा पुरस्कार डॉ. देगलूरकर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल, असे संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी सांगितले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेतर्फे सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षीपासून ‘भांडारकर स्मृती पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. प्रतिवर्षी हा पुरस्कार प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील एका विद्वानास दिला जाणार आहे. या पुरस्काराची घोषणा संस्थेच्या मंगळवारी (दि. ६) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये डॉ. सदानंद मोरे यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. सदानंद फडके होते.
दलाई लामा यांच्या ‘फ्रीडम इन एग्झाइल’ या आत्मचरित्राच्या डॉ. श्रीकांत बहुलकर आणि डॉ. शुचिता फडके यांनी केलेल्या ’विजनवासातील स्वातंत्र्य’ या अनुवादाचे विमोचन या प्रसंगी करण्यात आले.
--------------------------------------------------
अध्यक्षपदी अॅड. फडके यांची फेरनिवड, अध्यक्षपदी फिरोदिया
विविध अधिकार मंडळांच्या मंगळवारी झालेल्या सभांमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी अॅड. सदानंद फडके यांची तर उपाध्यक्षपदी प्रा. हरी नरके यांची फेरनिवड करण्यात आली. संस्थेच्या नियामक परिषदेच्या अध्यक्षपदी अभय फिरोदिया यांची आणि उपाध्यक्षपदी प्रा. प्रदीप आपटे यांची, तसेच कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी भूपाल पटवर्धन यांची फेरनिवड करण्यात आली.