पुणे : चित्रपटाला अर्थपूर्णतेच्या वाटेवर नेणाऱ्या, सामाजिक विषयांमधून वास्तवतेचे दर्शन घडविणाऱ्या संवेदनशील दिग्दर्शिका, पटकथाकार आणि निर्मात्या सुमित्रा भावे यांचे (वय ७८) सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने कला, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रांतील बहुआयामी कार्यशीलतेचा ‘भावे प्रयोग’ स्थिरावला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. बाई, दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी सात वेळा त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
चित्रपटाकडे मनोरंजनाच्या भूमिकेमधून न बघता चौकटीबाहेरचा विचार करून, साचेबद्ध मांडणीला छेद देत आशयघन चित्रपटांची निर्मिती करून सुमित्रा भावे यांनी मराठी चित्रपटांना वेगळा आयाम दिला. मानसिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित अधिकांश चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीचे श्रेय त्यांनाच जाते. गेल्या दोन महिन्यांपासून त्या फुप्फुसांच्या विकाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. पण मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मागे मुलगी सती भावे, नात, नात जावई असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी दिग्दर्शक सुनील सुकथनकर, अभिनेते गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेत्री रेणुका व देविका दफ्तरदार, मिलिंद जोग, यशोदा वाकणकर, अलोक राजवाडे, पर्ण पेठे, साकेत कानेटकर, वरुण नार्वेकर उपस्थित होते.
सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी एकत्रितपणे अनेक आशयघन आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी चौदा चित्रपट, पन्नासहून अधिक लघुपट, तीन दूरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले.
---------------------------------------------------------------------