पुणे : मराठी संगीत नाटकांमध्ये तबला संगतीतून नाट्यपदांना श्रवणीयतेच्या परमोच्च बिंदूपर्यंत नेणारे ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी निधन झाले. खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी प्रमिला आणि शिष्य परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर हडपसर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संगीत क्षेत्रात ‘छोटूकाका’ या नावाने ते परिचित होते. पं. विनायक थोरात यांचा जन्म १८ मे १९३५ रोजी झाला. त्यांचे बालपण दौंड येथे गेले. वडील रेल्वेत नोकरीत, तसेच तबलावादक असल्याने त्यांना लहानपणीच तबल्याची गोडी लागली. सुरुवातीला तबल्याचे शिक्षण त्यांनी वडिलांकडे, नंतर यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने घेतले. रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडे पुढील शिक्षण झाल्याने ताल, लय, सूर पक्के होऊन त्यांना लयीचे ज्ञान प्राप्त झाले. ते एकल तबला वादनाचे कार्यक्रम करीत असत. तरुणपणात शास्त्रीय संगीतातील दिगज्ज गायक मंडळींना त्यांनी संगत केली. त्यामध्ये प्रामुख्याने मोगुबाई कुर्डीकर, पं. जसराज, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. फिरोज दस्तूर, जोन्सना भोळे, वसंतराव देशपांडे, राम मराठे इत्यादींना त्यांनी उत्तम साथ दिली. मात्र, १९६२ नंतर नाट्यसंगीताला साथ करण्याकडे त्यांचा कल वाढला आणि छोटा गंधर्व जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार यांच्या सोबत तब्बल ४५ वर्षे त्यांनी संगत केली. गाण्याबरोबर जाणारी आणि गायनावर कुरघोडी न करणारी त्यांची तबलासाथ रसिकांच्या स्मरणात राहील. राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.