पुणे : कामाच्या वेळी टाइमपास करत असल्याची तक्रार केल्याच्या रागातून ४ तरुणींनी एका ६४ वर्षांच्या महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगणे खुर्द येथील पापल सेमिनरी व्हिला येथील कृपा फाऊंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चार तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे.
आरती पाटील, श्वेता शिंदे, गौरी पाराशेट्टी आणि अनुष्का नावाच्या चार तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिओना रॉनी फर्नांडिस (वय ६४, रा. परेल, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
या तरुणी कृपा फाऊंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात काम करतात. तेथेच फिर्यादी यांच्यावर देखील कामाची जबाबदारी होती. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास श्वेता शिंदे आणि गौरी या दोघी कामाच्या वेळी टाइमपास करत होत्या. हे पाहून फिर्यादी यांनी संस्थेच्या व्यवस्थापकाला त्यांची तक्रार केली. यातूनच त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर चौघींनी एकत्र येऊन फिर्यादीला लाथा मारून, बॅडमिंटन रॅकेटने डोक्यात मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच आमची तक्रार द्यायची नाही, अशी धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.