---
अवसरी : वय वर्षे ४५ व ज्या ज्येष्ठ महिला व पुरुषांना डायबिटीस व इतर आजार आहेत, त्या व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वयातील तरुणांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, या प्रकारच्या सूचना करण्यात आल्या. तसेच तरुणांनी ग्रामपंचायातीस सहकार्य करावे, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील कोरोना हॉटस्पाॅटने गावाची परिस्थिती व तेथील सोयीसुविधी जणूना घेण्यासाठी पठारे यांनी कोरोना हॉटस्पॉट गावांना भेटी दिल्या. अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पठारे यांनी कोविड १९ मधील हॉटस्पॉट असलेली अवसरी खुर्द, अवसरी बुद्रूक, गावडेवाडी, धामणी, पारगाव या गावांना मंगळवारी भेटी दिल्या व अवसरी बुद्रूक येथील आरोग्य अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, आशा मदतनीस, अंगणवाडी सेविका यांनी १४ गट तयार करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे नियोजन त्यांनी सांगितले. अद्यापपर्यंत गावात किती कोरोना रुग्ण आहेत, किती रुग्ण बरे झाले आहते, किती लोकांचे लसीकरण झाले आहे इत्यादी प्रकारची माहिती घेऊन अहवाल तयार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
अवसरी बुद्रूक येथील गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जाणीवपूर्वक लसीचे डोस देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप जयेश शहा व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर यांनी केला आहे. या वेळी सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, स्वप्निल हिंगे, पोलीस पाटील माधुरी जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष सर्जेराव हिंगे, ग्रामसेवक दीपक शिरसाट व तलाठी अतुल विभूते हे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १२ अवसरी बुद्रूक आंबेगाव
फोटो : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे कोविडबाबत ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठकीत माहिती देताना.