पुणे : तेरा सायकली, तीन दिवस आणि चारशे किलोमीटर..,तरूणांनाही लाजवेल अशी ही धाडसी मोहीम तेरा ज्येष्ठांनी नुकतीच पार पाडली व शालेय वयापासून असलेली असलेली लोणार सरोवर पाहण्याची हौस भागवली.पुणे सायकल प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही मोहिम पार पाडण्यात आली. पुण्यातून सुरू झालेला त्यांचा सायकल प्रवास अहमदनगर, औरंगाबाद, जालना मार्गे सिंदखेडराजा व नंतर लोणार सरोवर असा झाला. चारशे किलोमीटरच्या अंतराविषयी सांगताना प्रतिष्ठानचे संस्थापक व या मोहिमेतील सर्वाधिक ज्येष्ठ असलेले दत्तात्रय मेहेंदळे (वय, ७९) म्हणाले, ‘‘या अंतरात अनेक घाट होते, जीवघेणे चढ होते. मात्र न दमता एका जिद्दीने हा सगळा प्रवास पार केला. सायकल चालवणे ही सर्वांची समान आवड, त्यामुळे कंटाळा असा कोणालाही आला नाही. उलट सर्वांबरोबर रस्त्याने एकत्र सायकल चालवणे ही मौजेची गोष्ट होती. जिद्द धरलीच तर लांबचा प्रवासही कसा सुसह्य होतो हेच यातून आम्हालाही कळाले.’’केशव जहागीरदार, विनायक माढेकर, भरत केतकर, संजय कट्टी, अरविंद चितळे, दत्तात्रय गोखले, अविनाश मेढेकेर, प्रदीप भवाळकर, पद्माकर आगाशे, डॉ. सुभाष कोकणे, तानाजी सावंत, अनिल पिंपळीकर हे या मोहिमेतील अन्य शिलेदार. सायकल प्रतिष्ठान अंतर्गत त्याची नेहमी भेट होत असते. दरवर्षी ते अशी मोहीम काढत असतात. यावर्षी चर्चेत लोणार सरोवराचा विषय निघाला व चर्चेअंती तिथेच जायचे पक्के करण्यात आले. मेहेंदळे म्हणाले, ‘‘लोणार सरोवर परिसरात मी लोणारकर-दैनंदिन एक तास हा काही युवकांचा ग्रुप आहे. त्यांच्याबरोबर ओळख झाली. हे युवक दिवसातील त्यांचा कोणताही एक तास लोणार सरोवराच्या स्वच्छतेसाठी देतात.ज्याला जमेल त्यावेळेत येऊन तो काम करतो. आपल्या परिसराचे भूषण असलेले हे पर्यटनस्थळ स्वच्छ, सुंदर रहावे हा उद्देश त्यामागे आहे. त्यांच्या या उपक्रमाने आम्ही भारावून गेलो व त्यांच्याबरोबर एक तास दिला. संपुर्ण परिसर स्वच्छ केला. त्याचा आनंद काही निराळाच होता.’’सायकल प्रतिष्ठान ही संस्था सायकल चालवणे आवडणाऱ्या कोणाचाही आहे. असा कोणीही संस्थेत येऊ शकतो, संस्थेच्या उपक्रमात भाग घेऊ शकतो. त्यासाठी वयाची, अनुभवाची अशी कोणतीही अट नाही असे मेहेंदळे म्हणाले. संस्थेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ७ लक्ष्मीपूजन तपोभूमी सोसायटी, दत्तवाडी, पुणे ४११०३० येथे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
गोष्ट तेरा तरूण तुर्कांची : सायकलवरून गाठले लोणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 8:11 PM
या अंतरात अनेक घाट होते, जीवघेणे चढ होते. मात्र न दमता एका जिद्दीने हा सगळा प्रवास पार केला. सायकल चालवणे ही सर्वांची समान आवड, त्यामुळे कंटाळा असा कोणालाही आला नाही.
ठळक मुद्देपुणे सायकल प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही चारशे किलोमीटरची मोहीम पार