पुणे - पहाटे संगीत ऐकणे म्हणजे जणू श्रवणीय अनुभूतीच! सकाळच्या प्रहरी केवळ मंदिरांमध्येच संगीताचे सूर ऐकायला मिळतात. मात्र, ‘दिवाळी पहाट’मुळे सकाळचे राग ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली आहे. या प्रहरी सादर होणारे संगीत म्हणजे ईश्वराची आराधना असते, अशी भावना ज्येष्ठ पखवाजवादक पं. भवानीशंकर यांनी व्यक्त केली.युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ फिनोलेक्स पाईप्स व पीएनजी ज्वेलर्स यांच्या सहयोगाने दिवाळी पाडव्याच्या ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पं. भवानीशंकर यांच्या अद्वितीय अशा तालसौंदर्याचे दर्शन रसिकांना घडणार आहे. महाराष्ट्र हा संगीताचा गड आहे. भारतीय अभिजात संगीतविश्वाला याच महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली असल्याचे सांगून त्यांनी ‘दिवाळी पहाट’ या संकल्पनेचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘संगीत सादरीकरणासाठी पहाटेचे वातावरण खूप शुद्ध असते. परमेश्वराच्या प्रार्थनेसाठी पहाटेचा कालावधी हा उत्तम असतो. परंतु, आजच्या काळात सकाळच्या सत्रामध्ये सांगीतिक मैफलींचे आयोजन फारसे होत नसल्यामुळे भूपाळी, ललित किंवा अहिरवैभव सारखे राग रसिकांना ऐकायलाच मिळत नाहीत. मैफलीमध्ये अनेकदा सायंकाळच्या प्रहरातील राग ऐकायला मिळतात; पण त्यातही अनेकदा पुनरावृत्ती दिसते.’’पूर्वीच्या काळी रात्रभर सुरू झालेल्या मैफली सकाळपर्यंत रंगत असत. त्याला श्रोतृवर्गही लाभत होता. मात्र, सध्याच्या धावपळीच्या काळात रात्रीच्या मैफलींचे प्रमाण कमी झाले आहे. सकाळी नोकरीला जायची घाईगडबड असल्याने सकाळच्या मैफलींची जागा सायंकाळने घेतली आहे. मात्र, दिवाळी पहाटसारख्या संकल्पनेमुळे सकाळच्या प्रहरातील राग सादर करण्याचा आनंद कलाकारांना मिळू लागला आहे. श्रवणीय संगीतासाठी सकाळचे वातावरण अत्यंत पवित्र असते. आज दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना युवा पिढीदेखील गर्दी करीत आहे. यानिमित्ताने त्यांची पावले संगीताकडे वळत आहेत, ही जमेची बाजू आहे. ज्या घरात संगीत आणि अध्यात्म्याचे सूर ऐकायला मिळतात, त्या कुटुंबामध्ये नेहमीच आनंद आणि सुख यांचा वास असतो. जो काव्याच्या माध्यमातून परमेश्वराची आराधना करतो, त्याला ईश्वरीय अनुभूतीचा निश्चितच साक्षात्कार होतो. संगीताच्या माध्यमातून ईश्वर तुमच्या सेवेसाठी तत्पर असतो, असे मौलिक चिंतनही त्यांनी केले. सहयोगी प्रायोजक काका हलवाई स्वीट सेंटर, लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅप. सोसायटी, खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, लक्ष्मीनारायण चिवडा, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज हे आहेत. बेव्हरेज पार्टनर ऊर्जा, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी, हॉस्पिटॅलिटी पार्टनर जेडब्ल्यू मॅरिएट हे आहेत.कार्यक्रम स्थळ :महालक्ष्मी लॉन्सराजाराम पुलाजवळ, एरंडवणे, पुणेदिनांक : गुरुवार, ८ नोव्हेंबरवेळ : पहाटे ५.३० वाजताप्रवेश सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेशिका आवश्यक
सकाळच्या प्रहरातील रागांची अनुभूती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 2:16 AM