पुणे : कला बाहेरील अलंकाराने मोठी होत नाही. त्यासाठी मूल्यनिष्ठा महत्वाची असते. माणसांविषयीची आत्मीयता, जीवनाविषयीची आस्था आणि संवेदना हे मोठे मूल्य आहे, असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
कवी विनोद शिंदे लिखित आणि संवेदना प्रकाशित ‘शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून गझलकार रमण रणदिवे उपस्थित होते.
रणदिवे म्हणाले, ‘जगातल्या सर्व ज्ञानशाखांची थोरली बहीण म्हणजे कविता. कविता तुम्हाला जगायला शिकवते. कविता म्हणजे रक्त मांसाच्या अस्तित्वाला आलेला जाणिवांचा मोहोर असतो. कविता म्हणजे भावनांची साय असते.’
याप्रसंगी कवी विनोद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे यांनी पुस्तकावर भाष्य केले. विश्वास शिंदे यांनी आभार मानले. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करुन प्रकाशन सोहळा घरगुती पध्दतीने उत्साहात पार पडला.
फोटो - ‘शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) कवी विनोद शिंदे, डॉ. अरूणा डेरे आणि रमण रणदिवे.