पुणे : आयपीएलवर बेटिंग घेणाऱ्या दोघा आंतरराष्ट्रीय बुकींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांना अनेक सनसनाटी माहिती उघड होत आहे. अशोक जैन हा १९९२ पासून क्रिकेट बेटिंग घेत असून आतापर्यंत तो कधी पोलिसांच्या रडारवर आला नव्हता. त्याचबरोबर तो सोन्याच्या देवाणघेवाणच्या व्यवहारातही असल्याचे समजते.
अशोक जैन हा बालाजी या आणखी एका बुकीच्या संपर्कात असलेल्या गिऱ्हाईकांकडून क्रिकेट बेटिंग करीता रक्कम घेऊन पुढे बालाजी व इतरांकडे वळवत असल्याचे आढळून आले. तसेच तो बेटिंग लावण्याकरीता १ रुपयांस एक रुपया या दराने बेटिंग घेत असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत.
क्रिकेट लाईन गुरु, बेटवेअर, क्रिकेट एक्सचेंज ॲपद्वारे घेत होते बेटिंग
गणेश भुतडा याच्या घरात तब्बल ९२ लाखांची रोकड आढळून आली. तो वापर असलेला मोबाईल हा दुसऱ्या एकाच्या नावावर असून त्याचा वापर बेटिंग घेण्यासाठी केला जात होता. गणेश भुतडा याचा हवाला रॅकेटशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे त्याच्या घरी एकावेळी ९२ लाख रुपये सापडले तरी त्याच्या असलेला संबंध लक्षात घेता ही रक्कम किरकोळ असल्याचे सांगण्यात येते.
आयपीएल सट्ट्यावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींना अटक
भुतडा याच्या मोबाईलमध्ये रविवारच्या सामन्याच्या २७ चिठ्ठ्या आढळून आल्या. त्या या चिठ्ठ्या इतर लोकांनी लिहून त्याचे फोटो काढून व्हॉटसॲपवर पाठविले होते. मोबाईलची तपासणी केल्यावर अशा प्रकारच्या चिठ्ठ्या अनेक दिवसांपासून मोबाईलमध्ये आढळून आल्या. त्यासमोर पैशांचा हिशोब असलेल्या चिठ्ठ्या संग्रहीत असल्याचे आढळून आले आहे. या दोघांकडे सापडलेल्या मोबईलमध्ये त्यांच्याकडे बेटिंग करणारे आणि त्यांच्याकडून पुढे बेटिंग घेणारे अशा अनेकांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता असून त्यातून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.