पुणे : विषयाबद्दल माहिती नाही आणि बोंबलत सुटायचे हे आजच्या माध्यमांचे काम आहेत. स्वत:ची मत लादणारा माणूस सिस्टीममध्ये आणि माध्यमात असायलाच नको. मीडिया चित्रपटाला मोठे करणार नसेल, तर आम्ही चित्रपट निर्मितीचे धाडस कसे करायचे? अर्धा महाराष्ट्र शिव्या देतो, मग आमच्या चित्रपटात शिव्या असल्या तर काय झाले? ‘सेन्सॉर बोर्ड’ हा बागुल बुवा आहे. मराठी चित्रपट झोपावा म्हणून तो भो-भो करतो, असे टीकास्त्र चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सेन्सॉर बोर्डावर सोडले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पीफ फोरममध्ये ‘२०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाऊराव क-हाडे, दिग्पाल लांजेकर, संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, सौमित्र पोटे, मेघराज राजेभोसले आणि विनोद सातव उपस्थित होते.
सेन्सॉर बोर्ड ही एक सिस्टीम आहे. सिस्टीम मध्ये स्वत:चे मत कसे असू शकते? सेन्सॉर बोर्डावरील पदाधिका-यांची आपल्याला मिळणारी उत्तरे, त्यांचे नियम विचित्र आहे. हे पदाधिकारी स्वत:चे मत लादतात अशा शब्दातं तरडे यांनी सेन्सॉर बोर्डालाच लक्ष्य केले. निर्मात्यांनी लेखनात ढवळा ढवळ करायची नाही. लेखन चार माणसांशी चर्चा करून होत नाही. लेखक जेव्हा समूहाने लिहितो तेव्हा मोठी नाटकं साकार होतात. लेखन हे अधिष्ठान आहे, असेही ते म्हणाले.
मंगेश कुलकर्णी म्हणाले, मराठी चित्रपटाला २०१८ वर्षाचा मोठा आशीर्वाद लाभला आहे. प्रेक्षकांची साथ मराठी चित्रपटाला मिळाली. लक्ष्मीचा नाही तर सरस्वतीचा सुद्धा येथे सहवास लाभतो हे मराठी मनाचे वैशिष्ट्य आहे. २०१८ यावर्षी बॉलिवूड तोट्यात असून मराठीने चित्रपटाची अर्थव्यवस्था तारली. चित्रपट बनविणे हा एक भाग आणि मार्केटिंग करणे हा चित्रपटाचा दुसरा भाग असतो. चित्रपट हा कुटुंबातल्या प्रत्येकाला आनंद देणारा असावा. चित्रपट हा कलेचा व्यवसाय आहे. काही गोष्टी कलेलाही आपण देणे लागतो. हे एक प्रकारचे विज्ञान आहे. संदीप जाधव म्हणाले, चित्रपटाला फक्त पैसा लावणे, हे चित्रपट निर्मात्याचे काम नाही. तर, चित्रपटाच्या कथानकाचे सामर्थ्य काय, या कथानकामुळे प्रेक्षक प्रेक्षागृहामध्ये येईल का? हे बघावे लागते. कथानकातील सामग्रीच्या भरवशावर चित्रपट निर्मात्याला चित्रपटावर पैसा लावावा लागतो. चित्रपटातील अभिनेत्यांची निवड करण्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत निर्माता तिथे असायला हवा.