पुणे : ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणानंतर त्यांच्यावर उपचारासाठी अन्य कोविड रुग्णांसोबत ठेवू नये. तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनाही अन्य क्वारंटाईन व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी त्यांच्या विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन विषाणुचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिथून परतलेल्या प्रवाशांकडून इतरांना संसर्ग होण्याची भिती आहे. याअनुषंगाने सर्व प्रवाशांचे सर्वेक्षण करून त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेले प्रवासी व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी स्वतंत्र विलगीकरणाची व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. स्थानिक कोविड रुग्ण तसेच क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींना त्यांच्यापासून संसर्ग टाळण्यासाठी ही दक्षता घेतली जाणार आहे. याबाबत पाटील यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
ब्रिटनहून आलेला प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर नेहमीच्या उपचार प्रणालीनुसार उपचार करण्यात येतील. पॉझिटिव्ह रुग्णांच्या जिनोम सिक्वेंसिंगमध्ये नवीन विषाणू प्रकार आढळेल, त्यांची १४ व्या दिवशीही आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल. तसेच २४ तासाच्या अंतराने दोन नमुने निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना घरी सोडण्यात येणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
--
रोजची माहिती मागविली
ब्रिटनहून आलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या सर्वेक्षणाची माहिती आरोग्य विभागाकडून मागविली आहे. ते भारतात आल्याची तारीख, सर्वेक्षणाची तारीख यांसह भारतात आल्यापासून २८ दिवसांचा पाठपुरावा, आरटी-पीसीआर चाचणी झालेले, बाधित, जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एनआयव्हीमध्ये पाठविलेले नमुने, बाधितांच्या संंपर्कातील व्यक्ती, संपर्कातील बाधितांची चाचणी, पॉझिटिव्ह आढळलेले आदी माहिती उपसंचालक स्तरावरून दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत पाठवावी लागणार आहे.