धायरी : मुंबई- बंगळुरू ह्या राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघात होत असून याला राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे विभाग प्रमुख नीलेश गिरमे यांनी केला. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महायज्ञ करण्यात आला. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या वर्षी मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पुल परिसरात सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर धायरी परिसरातील नागरिक, राष्ट्रीय महामार्ग, वाहतूक पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्या सोबत अपघात रोखण्यासाठी बैठकीचे आयोजन केली होती. परंतु त्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात उपाय योजना केल्या गेल्या होत्या. त्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली आणि पुन्हा अपघातची मालिका सुरू झाली आहे.
या ठिकाणी अपघात होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असून त्यावर तात्काळ उपयोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावण्यात यावेत, स्टड लाईट बसवावेत तसेच विविध ठिकाणी रम्बल स्ट्रीप, सोलर बिल्कर् देखील लावण्यात यावेत, कर्ब पेंटिंग करावे, वाहन चालकांना ड्रिंक अँड ड्राईव्ह, गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालावा अश्या सूचना देणारे फलक लावण्यात यावेत.
महामार्गावर सातत्याने पडणारे खड्डे यावर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महामार्गावरील तीव्र उतार कमी करणे, ह्या सर्व उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे, तसे न झाल्यास शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना विभाग प्रमुख नीलेश गिरमे यांनी दिला आहे.