धायरी : मुंबई - बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले ब्रिजवर सेल्फी पॉइंटजवळील भूमकर पुल परिसरात पुन्हा अपघात (Accident) झाला आहे. एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रेनची बोगी घेऊन निघालेल्या कंटेनरला धडक दिली. या विचित्र चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनर चालक मात्र जखमी झाला आहे. नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने अधिकारी यांच्यात चर्चा अन् बैठकी शिवाय कोणत्याच उपाययोजना तातडीने केल्या जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
११ दिवसांत पाच अपघात; स्थानिक ग्रामस्थ संतप्त
- २१ ऑक्टोंबरला सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. - २२ ऑक्टोंबरला शुक्रवारी रात्री पुन्हा त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले. - शनिवारी २३ ऑक्टोंबर ला सकाळी साडेबाराच्या सुमारास नवले पुल परिसरात झालेल्या अपघातात एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या टेम्पोला, दुचाकीला तसेच एका चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली. या झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. - गुरुवारी २८ ऑक्टोंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट येथे एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट सेवा रस्त्यावर गेला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनर चालक मात्र जखमी झाला होता. - आज ३१ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ट्रेनची बोगी घेऊन निघालेल्या कंटेनरला पाठीमागून एका ट्रकने धडक दिली. या विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले असून ट्रक चालक जखमी झाला आहे.