पुणे : अधिक परताव्याचे आमिष दाखवून पुण्यासह, राज्यासह देशभरातील १८ लाख गुतंवणूकदारांना तब्बल ८ हजार कोटी रुपयांना गंडा घालणा-या रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब लिमिटेड आणि सिट्रस चेक इन या कंपनीच्या प्रवर्तकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्निवारी गुंतवणूकदारांनी केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने मंगळवारी (दि. १९) मोर्चाद्वारे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचे बैठकीत निश्चित झाले.सदाशिव पेठेतील कलाप्रसाद मंगल कार्यालयात गुंतवणूकदारांचा मेळावा झाला. त्या वेळी या कंपन्यांचे एजंट आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. राजश्री गाडगीळ, बापू पोतदार यांनी उपस्थितांना आंदोलनाची माहिती दिली. या कंपन्यांचे मुख्य संचालक ओमप्रकाश गोएंका व त्यांच्या संचालकांविरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) ३ जून २०१५ मध्ये कंपनीवर निर्बंध घातले. त्यानंतरही कंपनीने कोट्यवधींची गुंतवणूक स्वीकारली आहे. जून २०१६ पासून मासिक व्याज उशिराने मिळायला सुरुवात झाली. नंतर डिसेंबर २०१६ नंतर तेही बंद झाले. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे; मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चाने निवेदन देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास १३ टक्क्यांहून अधिक परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते; तसेच घरगुती वस्तू, सोने, दुचाकी, चारचाकी अशा विविध योजनांचे आमिष होते. पर्यटन योजनेच्या माध्यमातून ही परताव्याची योजना जाहीर करण्यात आली होती. त्यात बचत योजना, दामदुप्पट योजना अशा योजनांचादेखील भरणा होता. साखळी पद्धतीने याचा विस्तार वाढविण्यात आला.
चेन मार्केटिंगचे लाखो ‘बळी’, पोलीस आयुक्तांना मोर्चाद्वारे देणार निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 5:31 AM