कुरकुंभ : कौठडी (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत कार्यकाळ २०१४-१५ मध्ये मंजूर झालेल्या स्मशानभूमीच्या अर्धवट कामाच्या देखभालीसाठी लाखोंचा खर्च दाखवला असल्याची तक्रार अनिल आटोळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. सरपंचाच्या सहीच्या लेटर हेडचा गैरवापर करून खडी क्रशरला परवानगी दिल्याचे प्रकरण सुरू असतानाच अशा प्रकारे खोटी कामे दाखवून लाखोंचा अपहार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अर्धवट स्मशानभूमीच्या कामातील देखभाल खर्चामुळे कौठडी ग्रामपंचायतमधील पदाधिकारी, ग्रामसेवक यांच्या भोंगळ व मनमानी कारभार पद्धतीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या मासिक बैठका, वर्षातील विविध ग्रामसभा यामध्ये मंजूर केले जाणारे प्रस्ताव जाणीवपूर्वक बदल करून किंवा ग्रामसभेची मंजुरी नसताना देखील अतिरिक्त लिखाणासाठी जागा सोडून सोयीस्करपणे प्रस्ताव मंजूर करण्याच्या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील ग्रामसेवकांच्या कारभाराचे वाभाडे निघत आहेत.
--
चौकट
सहा वर्षांपासून काम अर्धवट
मागील सहा वर्षांपासून हे काम अर्धवट स्वरूपात असताना देखील ते पूर्ण झाल्याचा दाखल देऊन यावर देखभाल खर्च दाखवण्यात आला आहे. ठेकेदाराने प्रशासनाच्या मदतीने बिलाची रक्कम उचलल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, याबाबत प्रशासनही ‘अर्थपूर्ण’रीत्या शांत बसले असल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासनिक चातुर्य वापरून सर्वसामान्य ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा देण्याचे काम सुरू असल्याची निवेदनात म्हटले आहे.