अवसरी (पुणे) : शिरदाळे (ता .आंबेगाव) येथील शिरदाळे धामणी घाटात (दि.४) मध्यरात्री अपघात झाला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून चालक आणि वाहक तसेच बटाटा व्यापारी यात बचावले. गुळणी (ता. खेड) येथून बटाट्याने भरलेला हा टेम्पो श्रीगोंदा या ठिकाणी चाललेला असल्याची माहिती समजत आहे. साधारण मध्यरात्री एकच्या सुमारास बटाट्याने भरलेला टेम्पो शिरदाळे घाटात पलटी झाला. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक, वाहक तसेच व्यापारी थोडक्यात बचावले अशी माहिती नजीक राहायला असणारे धामणी येथील बाळासाहेब बोऱ्हाडे, विक्रम बोऱ्हाडे, सीमा बोऱ्हाडे यांनी दिली.
गेल्या वर्षभरातील हा तिसरा ते चौथा मोठा अपघात असून शिरदाळे ग्रामपंचायत, धामणी ग्रामपंचायत यांच्यावतीने वारंवार सिमेंट कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात येत आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात असून आता पुन्हा दोनही ग्रामपंचायच्यावतीने सबंधित विभागाला निवेदन देण्यात येणार आहे. कोणाचा जीव जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे का असा संतप्त सवाल धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, शिरदाळे गावच्या सरपंच जयश्री तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
अपघातातील एकाला गंभीर दुखापत असून दोघांना किरकोळ दुखापत आहे. परंतु वारंवार अपघात होत असताना संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी आणि सिमेंट कठडे बसवण्याची मागणी मान्य करून काम चालू करावे अशी मागणी शिरदाळे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे.
या रस्त्याचे काम झाल्यापासून या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. शिरदाळे येथील शाळेतील मुलं, महिला मजूर, शेतकरी यांची कायच वर्दळ या रस्त्याला असते आम्ही दोनही ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देण्यात येणार असून आता तरी दखल घेऊन हे काम मार्गी लावावे.
- रेश्मा बोऱ्हाडे