केडगाव : अवघ्या आठवड्यातच दुभाजकावर गाड्या आपटण्याची ही दुसरी घटना आहे. मागील महिन्यात आठ ते दहा गाड्या पारगाव येथे सुरू होत असलेल्या टोल नाक्यावर आदळल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे.
ट्रक दुभाजकावर थेट आदळल्याने जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे प्रचंड नुकसान झाले. हा अपघात एवढा मोठा होता की पुढे किंवा मागे सुदैवाने कोणतीही गाडी नव्हती. आजूबाजूला असणाऱ्या छोट्या-मोठ्या गाडींचा तर चुराडाच झाला असता. गाडीची चाशी दुभाजकावर अडकून राहिली व गाडी पलटी झाली. या रस्त्यावर अनेक गाड्या रस्ता सोडून बाहेर गेल्या आहेत. किरकोळ अपघातांची तर गणनाच होत नाही. रस्ता व्यवस्थापनाने रस्त्यामध्ये अनेक त्रुटी ठेवल्याने हे अपघात घडत आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे.
अपघात शुक्रवार, दि. २८ रोजी पहाटे घडला. गाडी आढळल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला. बऱ्याच ठिकाणी रिफ्लेक्टर नाहीत, दिशादर्शक नाहीत, अनेक ठिकाणी जिथे दुभाजक आहेत तिथे स्पीड ब्रेकर नाहीत. त्यामुळे वेगाने येणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण होत नाही. या रस्त्यावर प्रचंड वेगाने वाहने वाहत आहेत. त्रुटींकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष करून चालणार नाही. अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रस्ता व्यवस्थापन प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन अनेक त्रुटी सुधारून घेणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी छोट्या रस्त्यांवरून महामार्गावर रस्ते जोडले आहेत त्या ठिकाणी दिशादर्शक व स्पीड ब्रेकर केलेले दिसत नाही. ठिकठिकाणी मातीचे ढिगारे पसरलेले आहेत. रस्त्याच्या कडेने माती असल्यामुळे गाड्या घसरत आहेत. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे, हे रोखण्यासाठी व्यवस्थापनाने रस्त्यांमधील त्रुटींवर काम करावे. नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
रस्ता एक सलग सपाट नाही, चढउतारांमुळे गाडीचा तोल बिघडत आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी योग्य ती काळजी घेतलेली नसल्यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. -अमोल भांडवलकर, दापोडी
बाहेरून येणाऱ्या गाड्यांचा वेग जास्त आहे, वाहतुकीच्या नियमांचे बोर्ड, रिफ्लेक्टर, पांढरे पट्टे स्पीड कमी करण्यासाठी लावण्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी दुभाजक बंद करण्यासाठी नागरिकांची मदत होत नाही. लवकरच नागरिकांनी केलेल्या सूचनांचे पालन करून कंत्राटदाराला सूचना करू. -ऋचा बारडकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग