पुणे : शहरातील विविध गंभीर गुन्ह्यांत फरारी असलेल्या आरोपींना खंडणीविरोधी पथक एकने अटक केली. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या तिघांना वाल्हे गावातील एका डोंगराजवळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. मागील चार वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला वारजे गावठाण परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
अनिकेत विनायक जाधव (वय २३), ओंकार संतोष सातपुते (वय १८) आणि तेजस गणेश निवंगुणे (वय २०, सर्व रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाल्हे येथील एका डोंगरावर पोलीस अंमलदार रमेश चौधर व गजानन सोनवलकर यांना हे त्रिकूट येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, एका गुन्ह्यात मागील चार वर्षांपासून फरारी असलेला आरोपी वारजे गावठाण परिसरात आल्याची माहिती पोलिस नाईक नितीन रावळ आणि विवेक जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून विशाल नारायण सरकार याला ताब्यात घेतले. त्याला हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेन्द्रकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, एपीआय संदीप बुवा, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, अतुल साठे, प्रवीण राजपूत, रवींद्र फुलपगारे, मधुकर तुपसुंदर, संजय भापकर, रमेश चौधर, नितीन कांबळे, गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे, अमर पवार, हनुमंत कांदे यांनी केली.
--------------------------------------------------------------