पुणे : मी ओबीसी असल्यामुळे मला सभागृहात बोलू दिल जात नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी महापालिकेत केला. त्यांच्या या आरोपामुळे महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून त्यांनी मात्र या संदर्भात महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन देऊन सभात्याग करणे पसंत केले.
गुरुवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असताना ससाणे यांनी बोलू दिल जात नसल्याच्या कारणावरून सभात्याग केला. ते प्रभाग क्रमांक २३ मधून निवडून आले आहेत.सभागृहात शहरातील खड्ड्यांवर चर्चा सुरु होती. त्यावेळी त्यांनी अनेकदा हात उंचावून बोलू देण्याची विनंती केली. मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ते सभागृहाबाहेर गेले. मी ओबीसी असल्यामुळे मला बोलू दिल जात नसल्याचं पत्र त्यांनी महापौरांना दिले. त्यामध्ये बोलण्याची संधी दिली जात नसल्याने समस्या सोडवण्यात अडचणी येत असल्याचे नमूद केले आहे.आजपर्यंत सुमारे साठ प्रश्न विचारले असून त्यांना एकदाही सभागृहात विचारण्याची संधी देण्यात आली नाही असाही उल्लेख करण्यात आला आहे.