Ajit Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असल्याने प्रचारादरम्यान पवार कुटुंबातील सदस्य आमने-सामने येऊ लागले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. "अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. २०१९ पासूनच त्यांचे भाजपसोबत जाण्याचे प्लॅनिंग सुरू होते," असा दावा रोहित पवारांनी केला होता. रोहित पवारांच्या या आरोपाला आता अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवारांवर पलटवार करताना अजित पवार म्हणाले की, "तुम्ही मला किती वर्षांपासून ओळखता? मी असा बोलणारा, असा वागणारा माणूस आहे का? मी असा माणूस नाही. आम्ही वेगळे झाल्यामुळे काही लोकांना या निवडणुकीत संधी मिळाली आहे. त्यांना आता आकाश ठेंगणं झालं आहे आणि मोठा पुढारी झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. त्यामुळे त्यांच्या कोणाच्या वक्तव्याला मी उत्तर द्यावं असं मला वाटत नाही," अशा शब्दांत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
रोहित पवारांचा इंदापुरात हल्लाबोल
पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा यांनी नुकताच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी बोलताना रोहित पवार यांनी आपल्या भाषणातून अजित पवारांना लक्ष्य केलं. " रडणारे, पळणारे, घाबरणारे, त्यांच्यासोबत गेले. आपल्या बरोबर राहिलेले लढणारे सामान्य लोक आहेत," अशा शब्दांत आमदार रोहित पवारांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.
दरम्यान, "भाजपाच्या एकाही खासदाराने संसदेत मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला नाही. धनगर, लिंगायत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुप्रिया सुळे सातत्याने संसदेत मांडत आहेत. दडपशाहीच्या माध्यमातून बूथ ताब्यात घेऊ असं सत्तेतले लोक म्हणतात. मात्र सुप्रियाताईंची यावेळी लीड साडे तीन लाखावरून साडे चार लाखांपर्यंत असेल," असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.