Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:31 PM2024-10-31T16:31:22+5:302024-10-31T16:32:31+5:30
आर. आर. पाटील यांच्यावरील आरोपांनंतर राज्यभर मोठा गदारोळ उडाल्याने आज अजित पवार यांना पत्रकारांकडून याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : "माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्याच्या खुल्या चौकशीसाठीच्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही फाईल मला दाखवली. आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला," असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील सभेतून केला होता. या आरोपावरून राज्यभर मोठा गदारोळ उडाल्यानंतर आज अजित पवार यांना पत्रकारांकडून याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र माझ्या दृष्टीने तो विषय संपल्याचं सांगत अजित पवारांनी वाद आणखी चिघळू न देण्याची भूमिका घेतली आहे.
अजित पवार म्हणाले की, "जे काही व्हायचं ते झालं आहे, मला ते आता परत उकरून काढायचं नाही. माझ्या सद्सद् विवेकबुद्धीला जे पटलं ते मी सांगितलं आहे. त्याचा आणि निवडणुकीचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने तो विषय संपला आहे," असं स्पष्टीकरण अजित पवारांनी आज दिलं आहे.
रोहित पाटलांनी केला होता जोरदार पलटवार
अजित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. "आर. आर. आबा प्रामाणिकपणे, स्वच्छपणे काम करत होते. महाराष्ट्रात गृहमंत्रिपदी असताना पारदर्शक भरती करून घेतली. अत्यंत सक्षमपणे त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळले. आज आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली. आज त्यांच्यावर आरोप झाले, ते पाहून अतिशय दु:ख झाले. अजित पवार ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यांनी जे आरोप केले, ते कुटुंब म्हणून वाईट वाटले. आबा हयात असते तर आबांनी त्याला उत्तर दिले असते. आबांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला, यावेळी त्यांना मोठमोठ्या ऑफर असताना डान्स बार बंदीवर ते ठाम राहिले. महाराष्ट्रातील विचारांचे संरक्षण झाले पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल," असं रोहित पाटलांनी म्हटलं होतं.