लोकमत इम्पॅक्ट
पुणे : कोरोनाच्या रुग्णांची माहिती असलेल्या डॅशबोर्डवरील आकडेवारी अनेक रुग्णालयांनी मागील काही दिवसांपासून अपडेट केली नव्हती. डॅशबोर्डवरुन तयार करण्यात येणाऱ्या महापालिकेच्या दैनंदिन अहवालात दाखवण्यात येणाऱ्या गंभीर रुग्णांच्या संख्येबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिध्द केले होते. त्याची तातडीने दखल घेत महापालिकेने रुग्णालयांना माहिती अपडेट करण्याचे आदेश दिले. रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि आरोग्य अधिकारी यांची बैठक पार पडली. त्यानंतर ताबडतोब अहवालातील गंभीर रुग्णांची संख्या घटण्यासही सुरुवात झाली आहे.
नायडू हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, सिंबायोसिस हॉस्पिटल अशा अनेक महत्वाच्या रुग्णालयांनी डॅशबोर्डवरील माहिती अपडेट केलेली नव्हती. शहरांमधील बेडची उपलब्धता जाणून घेण्यासाठी नागरिक या डॅशबोर्डचा आधार घेतात. माहितीच अद्ययावत नसल्यामुळे संभ्रम निर्माण होत होता. दैनंदिन अहवालात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णसंख्या ४८० ते ५०० पर्यंत होती. गंभीर रुग्णांची संख्याही ३८० पेक्षा जास्त दाखवली जात होती.
महापालिकेतर्फे माहिती अपडेट न करणाऱ्या रुग्णालयांना फोन, पत्राद्वारे नोेटीस पाठवली गेली. यासंदर्भातील बैठकही पार पडली. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वगळता सर्व रुग्णालयांनी रुग्णसंख्या, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची संख्या अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम दैनंदिन अहवालावर झाल्याचेही दिसून येत आहे.
---
रुग्णालयांना माहिती अपडेट करण्याबाबत फोन आणि पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. सर्व रुग्णालयांना फोन करुन अद्यायवत माहिती घेऊन रुग्णसंख्येचा दैनंदिन अहवाल तयार केला जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण काहीसे घटले आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
---
खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, मेडिकल ऑफिसर यांच्यासह बैठक पार पडली असून त्यांना माहिती अद्ययावत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. गंभीर रुग्ण आणि डिस्चार्ज दिलेले रुग्ण ही आकडेवारीही काटेकोरपणे तपासण्यास येत आहे.
- सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
---
तारीख गंभीर रुग्ण डिच्चार्ज रुग्ण
२५/१२ ३८७ ४९३
२६/१२ ३८९ ४१२
२७/१२ ३८७ ४७०
२८/१२ ३३३ ४०९
२९/१२ ३१३ ४८०
३०/१२ २४२ ३४९