ऑनलाइन लोकमत
चाकण, दि.03 - सर्प विष तस्करी प्रकरणी सांगली येथील एका सर्पमित्रास चाकण पोलिसांनी आज ( दि. ४ जानेवारी ) रात्री साडेदहाच्या सुमारास अटक केली याप्रकरणातील खारगेला साप पुरविणारे सांगलीतील आणखी दोन सर्पमित्र असून ते फरार झाले आहेत. विवेक शिवाजी सुतार ( वय २७, रा. कुंडल, ता. पलूस, जि सांगली ) असे अटक करण्यात आलेल्या सर्पमित्र आरोपीचे नाव आहे. विष विकत घेणाऱ्यांपैकी एक उत्तराखंड, एक उत्तर प्रदेशातील आहेत व साप पुरविणारे सांगलीतील आणखी दोघेजण आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी यापूर्वी तीन जणांना अटक केली असून आता अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. त्यात रणजित पंढरीनाथ खारगे वय ३७, रा. ए १/४०६,सारा सिटी, खराबवाडी, चाकण,ता.खेड, जि पुणे, मुळगाव कुंडल, ता. पलूस, जि सांगली, धनाजी अभिमान बेळकुटे वय ३०, मुळगाव वरकुटे मूर्ती, ता. करमाळा जि सोलापूर व आयसेरा बायोलॉजिकल प्रा. लि. या विष घेणाऱ्या कंपनीचा संचालक डॉ. नंदकुमार कदम यांचा समावेश आहे. फरार दोन सर्पमित्र व उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील दोन परप्रातीयांना ताब्यात घेतल्यावर सर्प विषाची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होणार आहे.
चाकण पोलीस, वन विभाग यांच्या संयुक्त कारवाई करून मंगळवार दिनांक २७ डिसेंबर २०१६ रोजी खराबवाडी येथील सारा सिटीत फ्लॅटवर छापा मारून खारगे व बेळकुटे या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४० घोणस, ३१ कोब्रा नाग व विषाच्या तीन बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. सापांचे विष तस्करी केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची पोलीस कोठडी चार जानेवारीला संपली आहे.
आरोपी कदम या डॉक्टरची स्वतःची कंपनी असून आरोपी खारगे याने कदमला ८ हजार रुपये प्रतिग्रॅमने २५ ग्रॅम विष विकून त्यास २ लाख रुपये मिळाले होते. या डॉक्टरने हे विष उत्तराखंड व उत्तरप्रदेश येथील कंपन्यांना विकले होते. खारगेला कोब्रा व घोणस पुरविणारे आणखी दोन सर्प मित्र सांगली येथील असून ते अद्याप फरार आहेत. पोलीस निरीक्षक मितेश घट्टे व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.