पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत 'सीरम इन्स्टिट्यूट'कडून जाहीर करण्यात आली आहे. आगीत सीरमच्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
"सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृत्यूमुखींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर करत आहोत", असं सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावला यांनी म्हटलं आहे.
अदर पुनावाला यांनीही व्यक्त केलं दु:खसीरमच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांनी दु:ख व्यक्त केलं. "दुर्घटनेत काहींना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती मिळाली. ऐकून अतिशय दु:ख झालं. मृत्यूमुखींच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत", असं ट्विट अदर पुनावाला यांनी केलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये दुपारी २ च्या सुमारास आग लागली होती. मांजरी भागात असलेल्या कोरोना लसीचं संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचं चिंतेची बाब नसल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं. आग लागलेल्या भागात काही कर्मचारी अडकले होते. त्यापैकी तिघांची सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आग लागलेल्या युनिटच्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. उद्या दुपारी मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.