पुणे : भारतात आपत्कालीन स्थितीत लसीकरणासाठी सीरम इन्स्टिट्युटकडून उत्पादित केल्या जात असलेल्या कोविशिल्ड लसीला हिरवा कंदील मिळाला आहे. तज्ज्ञ समितीने याबाबतची शिफारस भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) केली आहे. ‘डीसीजीआय’कडून यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ‘कोविशिल्ड’चा मार्ग मोकळा होणार आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनीकडून कोविशिल्ड लस विकसित करण्यात आली आहे. या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या सीरम इन्स्टिट्युटकडून केल्या जात आहेत. तसेच सीरमने आतापर्यंत पाच कोटींहून अधिक लसींचे उत्पादन केले आहे. जगातील काही देशांमध्ये कोविशिल्डसह फायझर व अन्य काही लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. कोविशिल्ड, फायझर व कोव्हॅक्सीन या लसींच्या भारतातील आपत्कालीन वापरासाठी ‘डीसीजीआय’कडे परवानगी मागण्यात आली आहे.
तज्ज्ञ समितीकडून या लसींच्या मानवी चाचण्यांसंदर्भातील निष्कर्षांची तपासणी करूनच मान्यता दिली जाते. त्यानुसार तिन्ही लसींची अतिरिक्त माहिती मागविण्यात आली होती. फायझर कंपनीने आणकी काही दिवसांची मुदत मागितली आहे. तर कोव्हॅक्सीन लसही अंतिम टप्प्यात आहे. कोविशिल्ड लसीच्या भारतातील चाचण्यांचे निष्कर्ष दिलासादायक आहेत. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत या लसीला मान्यता देण्याची शिफारस ‘डीसीजीआय’कडे करण्यात आली आहे. तज्ज्ञ समितीने केलेली शिफारस महत्वपुर्ण मानली जाते. त्यामुळे लसीच्या वापरावर ‘डीसीजीआय’कडूनही मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे.
----------------
कोविशिल्ड लसीची जमेची बाजी
- लसीची परिणामकारता ९० टक्के असल्याचा कंपनीचा दावा
- लसीला २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठविता येणे शक्य
- देशभरात साठवणुक यंत्रणा सज्ज
- देशांतर्गत उत्पादनामुळे सुलभ वितरण
- सुमारे पाच कोटी डोस तयार असल्याने काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर लसीकरण शक्य
------------