Adar Poonawalla Coronavirus Vaccination : सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर दुसरीकडे कमी होणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता कोविडचे सर्व निर्बंधही हटवले आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. "देशानं योग्य लस निवडली म्हणूनच यावेळी देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे," असं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
देशात जर कोरोनाची चौथी लाट आली तर ती कमी घातक असेल अशी अपेक्षा असल्याचं पूनावाला म्हणाले. "बूस्टर डोसबद्दल आम्ही सरकारकडे आवाहन केलं आहे. कारण ज्यांना प्रवास करणं आवश्यक आहे त्यांना बूस्टर डोसची गरज आहे. आपण सरकार सोबत चर्चा करत असून लवकरच बूस्टर डोसवर एक धोरण घोषित केलं जाऊ शकतं," असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांना ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटवर प्रभावी ठरेल का असा प्रश्न विचारण्यात आला. "त्या तेव्हाच काम करतील जेव्हा बूस्टर डोस घेतला जाईल. यामुळे भविष्यात येणाऱ्या व्हेरिअंटपासूनही सुरक्षा मिळेल. तज्ज्ञांची टीम सध्या दोन लसींच्या मिश्रणाच्या मुद्द्यावर विचार करत आहे. जगभरात त्याला मान्यता आहे," असं यावर इत्त देताना त्यांनी सांगितलं.