लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेला आम्ही लस विकत देण्यास तयार आहोत. परंतु, याबाबतच्या मान्यतेची परवानगी महापालिकेने केंद्र शासनाकडून आणावी, असे पत्र सिरम इन्स्टिट्यूटने सोमवारी (दि. २४) महापालिकेला पाठविले.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेली सिरम ही पुण्यात स्थापन झालेली आहे. इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने अॅस्ट्राझेनका कंपनीसोबत संशोधित केलेल्या कोरोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनाचे हक्क सिरमने मिळवले आहेत. त्यानुसार ‘सिरम’च्या पुण्यातील प्रकल्पांमध्ये कोविशिल्ड या कोरोनावरील लसीचे उत्पादन चालू झाले आहे. पुण्यातून जगभर जाणारी कोरोना लस पुणेकरांना प्राधान्याने मिळावी अशी भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने ‘सिरम’शी संपर्क साधला होता. त्याला ‘सिरम’ने उत्तर दिले आहे.
पुणेकरांना सिरमने कोविशिल्ड उपलब्ध करुन द्यावी, ही मागणी पुणे महापालिकेने गेल्या तीन आठवड्यांपासून सिरमकडे लावून धरली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सिरमच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेतली. राज्य व केंद्र शासन स्तरावरही लसप्राप्तीसाठी महापालिकेने सातत्याने पत्रव्यवहार केला आहे.
सिरम इन्स्टिट्यूटने सोमवारी महापालिकेला पत्र पाठवून लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र याबाबतची कायदेशीर प्रक्रिया व इतर मान्यता केंद्र शासनस्तरावरून मिळवण्याची जबाबदारी त्यांनी महापालिकेला घेण्यास सांगितले आहे.
चौकट
“केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी पत्रव्यवहार करून पुण्याला विशेष बाब म्हणून ‘सिरम’कडून लस घेण्याची परवानगी महापालिकेने मागितली आहे,” असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. हे प्रयत्न सुरू असतानाच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याच्या प्रक्रियेसही गती दिली आहे. येत्या दोन दिवसांत निविदा काढली जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
चौकट
खासदार, मंत्र्यांची मदत होणार का?
सिरमकडून लस घेण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना केंद्रात मंत्री असलेले पुण्यातील प्रकाश जावडेकर आणि दिल्लीत पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार गिरीश बापट यांची साथ मिळणार का? कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. पाटील देखील पुण्यासाठी त्यांचे बळ दिल्लीत पणाला लावणार का? हे प्रश्न पालिका वर्तुळात चर्चिले जात आहेत.