लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आग लागल्यामुळे सिरमचं मोठं नुकसान झाले आहे. त्याबद्दल आपण पंतप्रधान यांना पत्र लिहिणार असून, आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने दहा लाख आणि सिरमने कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
सिरमला भेट दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, सिरममध्ये आग लागली की लावली याची चौकशी होणे आवश्यक आहे.
न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलन थांबले पाहिजे होते. शेतकरी नेतेच आज आंदोलन करत आहेत. बाजार समित्या बंद करणे ही सरकारची भूमिका नाही. कृषी कायदा मागे घेणं योग्य नाही, दबाव आणून कायदे मागे घ्यायला लावणे चुकीचं आहे. याबाबत केंद्राने बैठका घेण्यातही अर्थ नाही. शरद पवार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत. आता कृषी कायद्याचा शरद पवार यांनी अभ्यास करून कायद्यात बदल सुचवायला हवा, असेही आठवले म्हणाले.
-----
चौकट
उद्धव ठाकरेंनी पुन्हा बीजेपीसोबत जावे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा पाहून वाटतंय की, उद्धव यांना ते सांगत आहे की उद्धव ठाकरे यांनी बीजेपी सोबत परत जायला हवे. असे सांगून आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी बीजेपीसोबत परत जायला हवे असे सांगितले. दरम्यान, राज्यातील सरकारचे भविष्य मला दिसत नसून, एकतर काँग्रेस पक्ष हात काढून घेईल नाहीतर दोन पक्षाला कंटाळून उद्धव ठाकरे आमच्यासोबत येतील, असेही ते म्हणाले.
---
मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा
प्रत्येकाला आपल्या जातीची ताकद कळेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याकरिता जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे, अशी ओबीसीचीही मागणी असल्याचे सांगून आठवले यांनी मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा असल्याचे सांगितले.
एल्गारमुळे कोरेगाव भीमाला दंगल झाली नाही
एल्गार परिषद घेण्याचा त्यांना अधिकार आहे, पण त्यात नक्षलवादी लोक असू नयेत. आंबेडकर, गांधीवादी लोक असावे. एल्गारमुळे कोरेगाव भीमाला दंगल झालेली नाही.
संभाजी भिडे दोषी असेल तर कारवाई करावी
नक्षलवाद्यांनी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेऊ नये, असे या वेळी आठवले म्हणाले. संभाजी भिडे दोषी असेल तर या सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.