पुणे: कोविड प्रतिबंधक कोविशील्ड लस उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट पुण्यासाठी २५ लाख डोस देण्यासाठी तयार असतानाही केंद्र सरकार परवानगी देण्यासाठी घोळ घालत असून यामागे टक्केवारीचे राजकारण आणि भाजपमधील अंतर्गत कलह असल्याचा आरोप माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे. केंद्रातील खासदार गिरीश बापट यांची पत कमी झाल्याचेही जोशी म्हणाले.
पुणे महापालिकेत काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जोशी म्हणाले, कोरोनाच्या कठीण स्थितीमध्ये कोविशिल्ड लस उत्पादन करणारी सिरम इन्स्टिट्यूट ही कंपनी पुण्यासाठी २५ लाख डोस द्यायला तयार झाली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी पुणे महापालिकेला पत्र पाठवून लसीचे २५ लाख डोस देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळवावी असे सुचवले. या गोष्टीलाही दोन आठवडे उलटून गेले. तरीही, केंद्राकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामागे टक्केवारीचे काही राजकारण चालले आहे का? असा संशय पुणेकरांना येत असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून परवानगी मिळविण्यात भाजपमधील अंतर्गत कलह कारणीभूत ठरत असून पुण्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा एक गट आहे आणि खासदार गिरीश बापट यांचाही एक गट आहे. त्यातून परवानगीसाठी बापट प्रयत्न करताना दिसत नाहीत. दिल्लीत बापटांची पत उरलेली नाही असे जोशी म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरही पुणेकरांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. -----जोशी यांच्या आरोपांबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता "कोण मोहन जोशी? ते अभिनेते का?" असे म्हणत जोशी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.