प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकशाहीत लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची संधी मिळाली़ आपल्याला पगार मिळतो़ पगार घेऊन सामाजिक काम करण्याची ही संधी आहे़ लोकांमध्ये थेट मिसळून त्याप्रमाणे निरपेक्ष भावनाने काम केल्यास लोकही चांगला प्रतिसाद देतात, असा मला अनुभव आला आहे़ आधिकाधिक चांगले काम करण्याची समाजसेवेची संधी आहे़ कोणत्याही कामात सकारात्कता दाखविल्यास व तसे काम केल्यास आणखी काम करण्याची प्रचंड उर्जा मिळते, असा माझा अनुभव असल्याचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी लोकमत शी बोलताना सांगितले़कोकण विभागीय आयुक्त म्हणून प्रभाकर देशमुख हे नुकतेच निवृत्त झाले़ त्यांच्या आजवरच्या सेवेबद्दल रविवारी पुण्यात त्यांचा माण गौरव समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे़ मुळचे माण तालुक्यातील असलेले प्रभाकर देशमुख हे १९८२ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले़ तेव्हापासून २०१७ पर्यंत कोकण विभागीय आयुक्त म्हणून काम करीत असताना आलेल्या अनुभवाविषयी ते म्हणाले, संपूर्ण कारकिर्दीत जेथे जेथे काम करण्याची संधी मिळाली, तेथे नेहमीच्या कामापेक्षा वेगळे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला़ पंढरपूर येथे काम करीत असताना शासनाने बडव्यांकडून नुकतीच मंदिर ताब्यात घेतले होते़ सुरुवातीला कोणत्याही कामासाठी विरोध होत होता़ समन्वयाने त्यातून मार्ग काढून पुजा व्यवस्था मार्गी लावली़ मंदिरात चिखलाचे साम्राज्य होते़ वारकऱ्यांना त्याच परिस्थितीत ३० -३० तास रांगेत थांबावे लागत असे़ त्यावेळी हातात १० लाख रुपये असताना ७० लाखांचे दर्शन मंडपाचे काम हाती घेतले़ लोकवर्गणीतून ३ वर्षात हे काम पूर्ण केले़ वारकऱ्यांना सुविधा दिल्याचे खूप मोठे समाधान आहे़ कोल्हापूरला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असताना राजश्री शाहू सार्वंगिण शिक्षण कार्यक्रम राबविला़ त्यामध्ये १७२८ शाळा, २ लाख ७१ हजार विद्यार्थी आणि ८ हजार ५०० शिक्षण सहभागी झाले़ मुलांमध्ये बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक जाणीव निर्मिती केली़ मी स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्याने त्या अवस्थेतून गेलो होतो़ पालक शिक्षकांच्या सहभागातून प्रकल्प यशस्वी केला़ स्वतंत्र संस्थेकडून त्यांचे मुल्यमापन करुन घेतले़ हा उपक्रम प्राथमिक शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरला़ त्याला केंद्र शासनाचा अतिउत्कृष्ट सेवेबद्दलचा पंतप्रधान पुरस्कार मिळाला़ हे सर्वाधिक समाधान देणारे काम वाटते़ याशिवाय कृषि आयुक्त म्हणून काम करताना पिकाचे नुकसान थांबविण्यासाठी कीड रोग निदान व नियंत्रणाबाबत कॉप सव्हिलॅन्स आॅफ अॅडव्हायजरी प्रकल्प राबविला़ त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुसऱ्यांदा प्रशासनातील उत्कृष सेवेसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले़ कीड सर्व्हेक्षण व नियंत्रण प्रकल्पाबाबत ई -गर्व्हनन्स अंतर्गत त्यांना राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण प्रदकाने गौरविण्यात आले़ डाळ उत्पादनात भरघोस वाढ केल्याने २०१० -११ मध्ये १ कोटी रुपयांच्या कृषि कर्मण पारितोषिकांनी सन्मानित केले गेले़ या सेवा काळात राजकीय पदाधिकाऱ्यांशी संघर्षाचा प्रसंग आला नाही़ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने काम केले तर खूप चांगले काम होते, असा अनुभव आहे़ पुण्यात काम करीत असताना जिल्हा बँक, साखर कारखान्यांच्या निवडणुकात स्थानिक पातळीवर खूप मतभेद असतात़ पण आपण कायदेशीर आणि पारदर्शक काम केले तर ते सर्वांनाच मान्य करावे लागते़ या निवडणुकात एकही तक्रार झाली नाही़ शेवटच्या काळात रायगड किल्ला विकास, जतन व संवर्धन विकास योजनासाठी ६०० कोटींचा आराखडा तयार करुन महाराष्ट्र शासनामार्फत अंमलबजावणी सुरु केली आहे़ पुरातन विभाग व लोकसहभागातून या कामांमुळे रायगडचे चित्र बदलून जाईल़ सर्वांना प्रेरणा देणारे तीर्थक्षेत्र आहे़ हा ठेवा आपण जतन करुन ठेवायला हवा़ देशाला अभिमान वाटावा असा हा ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने काम करण्याची संधी मिळाली, हे एक समाधान आहे़
प्रशासकीय कामातून सेवेची संधी
By admin | Published: June 02, 2017 1:39 AM