पुणे : समाजातील दीनदुबळ्यांची, वंचित, उपेक्षितांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.
पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने मदर तेरेसा यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘मदर तेरेसा पुरस्कार-२०२१’ सिस्टर फिलोमिना थॉमस यांना बागवे यांच्या हस्ते देण्यात आला. नगरसेविका लता राजगुरू, अमीर शेख, राहुल शिरसाट, दत्ता पोळ, अनिस खान, कुणाल राजगुरू, क्लेमेंट लाझरस, विनोद निनारिया, मुन्ना शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.
पंडित वसंतराव गाडगीळ, भन्ते सुदस्सन, ज्ञानी छिंदरपाल सिंग, मौलाना हाफिज एहतेशाम, फादर स्टॅनली यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वशांतीचा संदेश दिला. सिस्टर फिलोमिना थॉमस यांनी त्यांना मिळालेला सन्मान त्यांच्या सहकाऱ्यांना समर्पित करत असल्याचे सांगितले.
पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांचाही गौरव करण्यात आला. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख विठ्ठल गायकवाड, राजेंद्र शिरसाट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.