अजित पवारांना बालेकिल्ल्यातच धक्का; १६ माजी नगरसेवक रात्री शरद पवारांच्या भेटीला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:35 PM2024-06-30T12:35:53+5:302024-06-30T12:38:01+5:30
पिंपरी चिंचवड येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतांश लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपली जादू दाखवली आणि पक्षाचे आठ खासदार निवडून आणले. निवडणूक निकालानंतर आता वातावरण बदललं असून अजित पवारांच्या पक्षातून शरद पवारांकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अशातच काल रात्री पिंपरी चिंचवड येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी ही भेट झाल्याचे समजते.
लोकसभेतील यशानंतर आता शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करत असताना इतर पक्षातून येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांसाठी पवार यांनी आपल्या पक्षाची दारे खुली केल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या महिला नेत्या आणि माजी केंद्रिय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर कोल्हापुरातील अजित पवारांच्या पक्षातील नेतेही शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवड येथील माजी नगरसेवकांनी पवार यांची भेट घेतल्याने अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नगरसेवकांच्या भेटीबाबत आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवार यांनीही या भेटीला दुजोरा दिला आहे.
नेत्यांच्या इनकमिंगबाबत रोहित पवारांनी काय दावा केलाय?
विधानसभा निवडणुकीआधी आमच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. "विधानसभेमध्ये महायुतीचे सर्व नेते तोंडाकडे बघत राहतील अशी परिस्थिती येणार आहे. १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचे नाही घ्यायचे हे ते दोघेच ठरवतील. जयंत पाटील हुशार नेते आहेत. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा काय होते. येणारे खूप आहेत, घ्यायचे किती हा प्रश्न आहे आणि शरद पवार याबाबत निर्णय घेतील," असा दावा रोहित पवारांनी केला आहे.