Sharad Sonawane ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवजन्मभूमी शिवनेरी येथून 'शिवस्वराज्य यात्रे'ची सुरुवात केली. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महायुतीला धक्का बसला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार शरद सोनवणे यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. तसंच सोबत भोजन करत चर्चाही केल्याचं पाहायला मिळालं.
तिकीटवाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतही अंतर्गत संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. जागावाटपात विद्यमान आमदारांना प्राधान्य दिलं जाणार असल्याने इतर इच्छुकांकडून दुसऱ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता जुन्नरच्या माजी आमदारानेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शरद सोनवणेंनी काय स्पष्टीकरण दिलं?
राजकीय चर्चांना उधाण येताच जयंत पाटील यांच्यासोबतच्या भेटीवर शरद सोनवणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. राज्यातील एखादा मोठा नेता जुन्नरमध्ये आल्यानंतर माजी आमदार या नात्याने मी त्यांची भेट घेत असतो. जयंत पाटील यांना भेटल्यानंतर त्यांनी मला सोबत भोजन करण्याची विनंती केली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही," असा दावा सोनवणे यांनी केला आहे.
अतुल बेनकेंनीही घेतली होती पवारांची भेट
शरद पवार हे काही दिवसांपूर्वी उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हेदेखील तिथे दाखल झाले आणि त्यांनी पवार यांची भेट घेत चर्चा केली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार बेनके यांनी सहा महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र नंतरच्या काळात त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसला आणि शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे पुन्हा खासदार झाले. बेनके यांच्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातूनही कोल्हे यांनी मोठं मताधिक्य घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या आश्रयाला जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता माजी आमदार असलेल्या शरद सोनवणे यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांची भेट घेतल्याने आगामी काळात जुन्नरच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.